वळूचे समिक्षण चांगलेच लिहीले आहे. अभिनंदन श्री. अजानुकर्ण.

'वळू' चित्रपटाबद्दल माझ्या भावना संमिश्र आहेत. चित्रपटाची सुरुवात, ग्रामिण संवाद, (किंचित) राजकारणं आदी गोष्टी जरी वाखाणण्यासारख्या असल्या तरी 'वळू'ने निराशाच केली.

'वळू' ला पकडण्यासाठी थेट आमदारांपासून वशिला लावून 'फॉरेष्ट' ला ह्या कामावर नेमणे आणि वळूला पकडणे एवढा काही तो 'हिंस्त्र' झालेला दाखवलेला नाही. चार उनाड बैलांसारखाच खोडकरपणा जरासा करतो. पण तेवढ्याने त्याला जेरबंद करण्याची आवश्यकता अधोरेखित होत नाही. दरवेळी पडद्यावर वळू दिसतो तेंव्हा विशिष्ट संगित वापरून त्याचं 'महत्त्व' वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. संगित वगळता वळू अगदीच 'बाळू' वाटतो.

कित्येक कॅरेक्टर्स ही नीट फुलवली गेली नाहीत, कित्येक कथानकात अनावश्यक आहेत. काही प्रसंगांना उगाचच महत्त्व देऊन शेवटी ते फुसके बारच ठरले आहेत. (उदा. अमृता सुभाषचे शिवा बरोबर पळून जाणे). दिलीप प्रभावळकर आणि निर्मिती सावंत हेही तसेच उपरे, कथानकास वरून चिकटवलेले वाटतात.

सरपंचाचे कॅरेक्टर अजून स्ट्राँग, दमदार बनविता आले असते. (तशी गरजही आहे.) तरूण नेतृत्व 'आबा' व्यवस्थित रंगवला आहे. कायम, सरपंचाच्या विरोधात राजकारण करणारा आबा वळूला सरपंचाच्या आधी पकडण्यासाठी समांतर मोहिम राबवितो आणि 'फॉरेष्ट' मदतीला बोलविल्या बरोबर त्याच्या पार्टीत म्हणजे पर्यायाने सरपंचाच्याच पार्टीत सामिल होतो हे अनाकलनिय आहे. उलट दोन पक्षातील वळूला पकडण्याची चुरस, स्पर्धा जास्त रंगवली असती तर प्रेक्षकांची उत्कंठाही वाढली असती.

प्रत्यक्ष वळूचा सामना होतो तो प्रसंगही विनोदी करण्याच्या नादात कथानकातील त्या प्रसंगाचे गांभिर्य पातळ करून टाकले आहेत. त्या प्रसंगात (संपूर्ण चित्रपटभर निर्माण केलेले) नाट्य कुठेच दिसून येत नाही.वळूला ब्लोअरने इंजेक्शन मारल्यावर तो बेशुद्ध होईल व आपण त्याला हातपाय बांधून गाडीत टाकू असे वारंवार 'फॉरेष्ट'ने सांगितल्यावर तसा 'सिन' अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात इंजेक्शन मारलेला वळू गाडीत मस्तपैकी इकडे तिकडे टकामका बघत आपल्या चारही पायांवर चक्क उभा असतो.

जीवन्या, आबा बेष्ट. सतिश तारेला अजून चांगल्या प्रकारे वापरता आले असते. त्याला फार कमी स्कोप दिला आहे. पण त्याचा मेक-अप खास शेतात काम करताना उन्हात रापलेल्या शेतकऱ्याचा दिला आहे तो ब्येष्ट.

एकंदरीत, चित्रपट कुठल्याही स्पर्धेत पारितोषिकाचा दावा करू शकत नाही. पण, एकदा जरूर पाहावा असा आहे. पैसे फुकट जाणार नाहीत.