बरे झाले तुम्ही सांगितले. नाही तर आम्ही फुटाण्यांचा नावाने 'जागर' करीत बसलो असतो. फुटाणेंनी मांडलेली कल्पना छान आहे. पण मला वाटतं, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केल्यास उत्तम. उदाहरणार्थ: "बोबडी वळली तरी बेहत्तर मी इंग्रजी शब्द वापरणार नाही. मराठी शब्द सुचेपर्यंत थांबीन," असे मनाशी ठरवले तरी चालेल. आमचे एक मित्र फारच मराठी बोलतात. म्हणजे ती अगदी श्वास घेतल्यासारखी साधी सोपी नसली तरी त्या मराठीत इंग्रजी शब्द नसतात. त्यांच्या सहवासात असलो की आम्हाला झक मारून इंग्रजी शब्द टाळावेच लागतात.

अवांतर
मराठी शिक्षकांची लायकीही तपासून पाहायला हवी, असे वाटतं. शाळांत आणि महाविद्यालयांत चांगले शिक्षक हवेत. मराठी अभ्यास परिषदेच्या "भाषा आणि जीवन" ह्या त्रैमासिकाच्या एका अंकात ह्यावर चांगला लेख (बहुधा डॉ. नीलिमा गुंडी ह्यांचा) आला आहे.  मराठी अभ्यास परिषदेत एका कार्यशाळेत ("कवितेचा आस्वाद कसा घ्यावा" ह्यावर ती कार्यशाळा होती)कनिष्ठ महाविद्यालयांत शिकवणाऱ्या शिक्षकांना एक प्रश्नावली देण्यात आली होती. त्यात "पुरुषराज अळुरपांडे" म्हणजे कोण, हा प्रश्न विचारण्यात आला होता. ह्या प्रश्नाचे उत्तर केवळ दोघांनाच देता आलं. ह्यावरून मराठी शिक्षकांचा व्यासंग किती दिव्य आहे, हे कळतं.