मुळात, माझ्या ओल्या मातीच्या मडक्याचे काठ वळवले गेले ते मुंबईत (सुरुवातीची २८ वर्षे). पुढे हे काठ गल्फ मध्ये मस्कतच्या कडक उन्हात वाळले (पुढची २३ वर्षे) आणि सध्या (गेली ३ वर्षे) पुण्यात वास्तव्य आहे.

लेखन हा माझा आवडता छंद आहे. दुर्दैवाने सध्या वेळही मिळत नाही आणि वेगळ्या कल्पनाही सुचत नाहीत. सृजनशीलताच आटली म्हणानात. पण होतं काय एखाद्याचे लेखन सुंदर असले, आवडले की प्रामाणिक अभिप्राय देऊन स्वतःची लेखन - हौस भागवून घेतो.

महाराष्ट्रातील गड - कोट पाहण्यांची मलाही भयंकर दांडगी हौस आहे. पण पहिल्या दोन ओळीत माझ्या वयाचे रहस्य दडलेले आहे. ते पाहता मला हे जमेल की नाही ह्या बद्दल मी स्वतः साशंक आहे. पण गडांची विस्तृत माहिती मिळाली तर त्या - त्या गडाबद्दल मनात ओढ निर्माण होऊन कदाचित हुरूप येईल असे वाटते. माझ्या माहितीत अनेक तरुण, मध्यमवयीन (अनुभवी आणि काटक) आहेत जे अशी भ्रमंती करीत असतात. त्यांच्या बरोबर जावे असे अनेकदा वाटते परंतु, मला गड चढण्याची अजिबात सवय नाही आणि गुडघे त्रास देतात. त्यामुळे त्यांच्या कोणाच्या गळ्यात लटकून त्यांच्या सहलीचा विचका आपल्यामुळे होऊ नये असे वाटते. मी गेलो तर माझ्या कुटुंबासमवेत किंवा एखाद दुसऱ्या (माझ्या सारख्याच) मित्रा बरोबर जाईन म्हणतोय.

अर्थात, माझ्या ह्या भूमिकेची आपल्याला कल्पना नसल्यामुळे आपण तो प्रश्न विचारलात. मला अजिबात वाईट वाटले नाही किंवा राग आला नाही. पण आपणच म्हंटले आहे की जरा खवचटच होता प्रश्न म्हणून मीही वेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. असो. माझ्या मनात राग नाही तेंव्हा ओशाळे वाटून घेऊ नये.

धन्यवाद.