शिवसेनेच्या जन्मापासून आत्तापर्यंत अगदी उत्तम आढावा घेतला आहे. वाचताना जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला. कारण या सर्व घटनांचे आम्ही साक्षीदार आहोत.
शिवसेनेने मराठी अस्मितेच्या नांवा खाली जे आंदोलन केले त्याने त्या काळातील मृतवत मराठी समाजाला स्वत्वाची जाणीव झाली. शिवसेने काही आदर्श समाजवादी उपक्रमही (अँब्युलंस, वडापाव केंद्रे इ.) राबवून, शिवसेनेची हिंसा पसंद नसली तरी, मराठी माणसाच्या मनात शिवसेनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण केला. कित्येक मराठी तरूंणांना नोकऱ्या मिळाल्या. एंप्लॉयमेंट एक्स्चेंज मधून ८० टक्के जागा मराठी उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. कित्येक बेकारांना वडापाव आणि ऑटोरिक्षांच्या माध्यमातून व्यवसाय मिळाला. पण दुर्दैवाने, शिवसेना मराठी माणसाच्या मनांत एकीचे बीज रूजवू शकली नाही. स्वतःचे भवितव्य स्वतःच्या मनगटात शोधावे हा विचार रुजवू शकली नाही. मराठी माणसाचा हात सोडून शिवसेना राष्ट्रीय पातळीवर हिंदूत्वाच्या मुद्याकडे वळली आणि मराठी माणूस पुन्हा मागे पडू लागला. कारण तो आत्मनिर्भर कधीच झाला नाही. स्वतःच्या उत्थानासाठी त्याला कायम शिवसेनेची गरज भासत राहीली. वडापावचे स्टॉल आणि रिक्षा विकून तो पुन्हा बेकार झाला. परप्रांतियांवर दोषारोप करण्यास मोकळा झाला. त्यामुळे, मनसेचे फावले. राजकारणात अस्तित्वाच्या लढाईत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा कामास आला. शिवसेनेला आणि इतर राजकारण्यांना उबलेल्या आळशी मराठी माणसाला राज ठाकरेंच्या रुपात पुन्हा एकदा 'तारणहार' गवसला. वातावरण ढवळून निघालं. अमराठी चित्रवाहिन्यांनी मनसेच्या आंदोलनाला विरुद्ध झोड उठवून आख्या मराठी समाजाला मनसेच्या दारातच लोटलं आहे. असो. राज ठाकरेंनी कल्पनाही केली नसेल अशी प्रसिद्धी त्यांच्या आंदोलनाला मिळाली आहे. फक्त आता हेच पाहायचे आहे की ते ह्या वातावरणाचा किती परिपक्वतेने लाभ उठवतात.