देवनागरी अक्षरांवरील रेघ ही अक्षरे सुंदर दिसावीत म्हणून असते.  जलद लिहिताना ती नाही काढली तरी चालते, फक्त लिखाण सुंदर दिसणार नाही एवढेच, त्याला तयारी असेल तर शिरोरेषा काढू नका.  अर्थात कुठल्या लिखाणाला सुंदर म्हणायचे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. कुंकू लावल्याने भारतीय स्त्री सुंदर दिसते असे अनेक पाश्चात्त्यांचे मत आहे, पण  ख्रिश्चन आणि इस्लामधर्मियांना कुंकू लावायची धर्माने घातलेली बंदी आहे म्हणूनच केवळ,  नाहीतर त्यांच्या स्त्रियांनीपण कुंकू लावले असते.

शिरोरेषा असलेली मराठी-संस्कृत जितकी सुंदर दिसते तितकी हस्तलिखित हिंदी दिसत नाही. याचे कारण हिंदी लिहिताना अगोदर शिरोरेघ काढतात आणि मग,तिला जोडून हात न उचलता अक्षर काढतात. म्हणून हिंदीतला ल, श, र, स, ख मराठीपेक्षा वेगळा दिसतो.  र,सला आतून गाठ मारतात.  हे आतल्या गाठीचे रस वाचताना विरस करतात. श ची शेंडी कापल्याने ते अक्षर बोडके दिसते.  हात न उचलता काढायचे असल्याने मराठी शेंडीफोड्या श हिंदीत लिहिणे शक्य नाही.  छच्या पागोट्यातून थोडे केस बाहेर आल्यामुळे छसुद्धा गबाळा दिसतो. हात न उचलता  आणि रेघेला चिकटून काढल्याने हिंदी हस्तलेखनात ध-भ ला गाठी नसतात. 

शब्द जिथे संपतो तिथे ,अक्षराअगोदर काढल्याने, शिरोरेघ अचानक संपते, म्हणून हिंदी शब्द असमतोल दिसतात, मराठी दिसत नाहीत.