स. न. वि. वि.

आपल्या उत्तरांवरून जाणवलेल्या काही गोष्टी :

१ शुद्धलेखनाला आजच्या 'शास्त्रीय' भाषेत प्रमाणलेखन संबोधणे जास्त सयुक्तिक आहे.

२ अर्थ समजणे याचा अर्थ वाक्य बरोबर आहे असा होत असेल तर

एक गरम कप चहा आण.

एक कप गरम चहा आण.

या दोन्ही रचना योग्यच म्हटल्या पाहिजेत. कारण दोन्हीतूनही अर्थबोध होतोच. (आणि अर्थही एकच निघतो)

मग प्रमाणलेखन केले काय किंवा न केले काय, काहीच फरक नाही.

३ माझ्या माहिती प्रमाणे मराठीचे नियम संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये केले गेले आहेत. ते मराठीसाठी नव्हतेच असे म्हणणे मलातरी विचित्र किंवा पूर्वग्रहदूषित वाटते.

४ एका लेखात सर्व उत्तरे द्यावीत अशी कोणाचीही अपेक्षा नसणार. पण एखादेच उत्तर देताना किंवा दोष दाखवून देताना एखादे उदाहरण देता आले तर वाचणाऱ्याला आपले म्हणणे नेमकेपणाने समजू शकेल असे मला वाटते. उदाहरणार्थ, संस्कृत भाषेचे भूत मराठीच्या मानगुटीवर म्हणजे काय हे सांगताना एखादे उदाहरण दिल्यास सोपे नाही का जाणार ?

५ जालावरील चर्चा ही नवीन कालाचीच देणगी नव्हे काय ? प्रत्यक्षात भेटून बोलणे आजच्या धावपळीच्या युगात जमणे, तेही भौगोलिक अंतरे पार करून, ही कठिण गोष्ट आहे. ह्या चर्चेतूनही जास्त लोकांपर्यंत पोचणे, तेही त्यांच्या सवडीनुसार शक्य होते आहे.

या चर्चेस अधिक वेळ देता आला तर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयात मनोगत वर येणारे सभासद व पाहुणे नक्कीच रस घेतील असे मला वाटते.

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद

- पराग जोगळेकर