शिरोरेषा हा देवनागरी अक्षराचा एक भागच आहे. ती अक्षरांच्या 'माथी' मारलेली जास्तीची रेघ नव्हे(!), असे मला वाटते. लिहिताना मात्र दर अक्षरावर स्वतंत्रपणे रेघ न देत बसता शब्द झाल्यावर मारणे सोयीचे जाते. अक्षर खराब असताना आणि अक्षरांत आणि शब्दात अयोग्य मोकळी जागा राहण्याची शक्यता असतानासुद्धा एका शब्दातल्या सर्व अक्षरांवर सलग रेघ असल्याने शब्द सलग दिसतो आणि दोन शब्दांत मोकळी जागा दिसते. ज्या लिपींमध्ये अशी रेघ नाही तीत अक्षरांतली जागा एकतर जाणीवपूर्वक कमी ठेवायला लागते किंवा धावत्या लिपीत लिहून संततरेषेने सर्व अक्षरे पूर्ण करावी लागतात. बेशिस्तीने सुटी सुटी अक्षरे काढीत गेले तर शिरोरेषेच्या लिपीतील शब्द शिरोरेषेमुळे अखंड दिसण्यास मदत होते. इतर लिपींमध्ये हा गुण नाही.
मुलांवर देवनागरीचे हे सर्व गुण बिंबवायला हवेत असे मला वाटते. (डोक्यावर रेघ नसणे म्हणजे अक्षराचे डोके उडवण्यासारखे आहे असे आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, त्यामुळे रेघ ही अक्षराचा भागच आहे हे मनावर ठसले.)