माझ्या २ मार्चच्या प्रतिसादात मी म्हटले होते की, अर्थात कुठल्या लिखाणाला सुंदर म्हणायचे हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. तेव्हा शिरोरेषा काढल्यानेच अक्षरे सुंदर दिसतात असला दुराग्रह माझा नव्हता. पण तरीसुद्धा बोडकी(की मुंडीछाट?) मराठी अक्षरे माझ्या दृष्टीला सुंदर दिसत नाहीत, हे खरे. तरीपण शब्द पूर्ण लिहिल्यानंतर वर रेघ काढावी हे तितकेसे सोईस्कर नाही. म्हणजे वाक्य पूर्ण लिहिल्यावर डॉटिंग द आइझ् आणि क्रॉसिंग द टीझ् करण्यासारखे. इंग्रजीतल्या आय्-जे वर येणारा ठिपका(=डॉट/टिटल्) व टी-एफ् वर येणारा कट्, आणि देवनागरीतली शिरोरेषा यां तिघांमधला विचार एकच आहे. छापलेल्या इंग्रजी अक्षरातीत सेरिफ असलेली अक्षरे सान्स-सेरिफ अक्षरांपेक्षा सुबक दिसतात हे सांगायला नकोच!
आधी अक्षर(पूर्ण शब्द नाही!) आणि मग लगेच शिरोरेषा ही लिखाणाची आदर्श पद्धत. असे केल्याने भ-ध-थ च्या गाठी कापल्या जात नाहीत. आणि 'अ'ची टाळू रेघेत अडकत नाही. शब्द संपला तरी शिरोरेघ थोडीशी पुढे डोकावते आणि शब्द समतोल दिसतो. हिंदीत याच्या उलट केल्याने शब्द आणि अक्षरे कुरूप दिसतात, हे माझे मत.