सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर कौतुक माझे नाही, त्या मुलांचे करायला हवे. मी तसं म्हटले तर त्यांना किती चिल्लर गोष्टी शिकवल्या, ते तर माझ्याहून भरपूर जास्त काही शिकलेले आहेत. ज्याही व्यक्ती अशा कुठल्या संस्थांना कुठल्याही स्वरूपात वर्गणी वगैरे देत असतील त्यांनी ती त्या मुलांपर्यंत पोहोचतेय की नाही याची कबर घेणे जरूरी आहे असे मला वाटते. मी स्वतः टोकरीभर आंबे कचऱ्यात जाताना पाहिलेत तिथे.. एकही आंबा त्या पोरांना मिळाला नव्हता. त्यातली एक टीचर मायाळू होती तर ती चोरूनलपून त्या गोष्टी मुलांना द्यायची, पण मग तिला ओरडा बसायचा. तीही तो ओरडा मनाला लावून घेऊन जेवण नाही करायची !!! ते जगच अंगावर शहारे आणणारं आहे.. तिथली एकेक गोष्ट आणि एकेक अनुभव आतबाहेरून बदलवून सोडणारा आहे. माणूस म्हणून आपली लायकी जोखणारा आहे.

खरंतर मला माहितीच नव्हते की हा लेख इकडे प्रसिद्ध झालाय ते ! मी हा लेख मुळात ९ जुलै ०७ ला लिहायला सुरूवात केलेली खरी पण का कोण जाणे पूर्ण नाही करू शकले. असे बऱ्याचदा झाले माझे.. ! असो. नोकरीबदलाच्या काळात असल्याने परवा अचानक मूड लागला आणि सर्रकन् हा लेख पूर्णही करून झाला. प्रसिद्ध करावा वाटला आणि नाहीही. करू की नको विचार करताकरता करायचे ठरवले आणि सुपूर्त करा वर टिचकी मारली.. पण बराच वेळ झालेलं लिहिणं सुरू करून त्यामुळे सेशन आऊट झाले आणि थिस पेज कॅन नॉट बी डिस्प्लेड आले !!! मी लेख कॉपीही केलेला नव्हता.. मग काय? फुल्ल मूड ऑफ ! परत जेव्हा मनोगत पाहिले तेव्हा चुकून अर्धवट लेख तर प्रसिद्ध झालेला नाही ना ते पाहिले पण तसे काही नव्हतेसे कळले. लेख अर्धवटच होता पण अप्रकाशित अवस्थेत होता ( म्हणजे जैसे थे ! ). मग मी हा लेख परत लिहिण्याच्या भानगडीत न पडण्याचे ठरवले. आज अचानक योगायोगाने बघितले तर लेख जसा मी सगळ्यात शेवटी सुपूर्त केलेला तसा प्रसिद्ध झालाय आणि वर प्रतिसादसुद्धा !!! सगळंच अजब आणि आनंदाचा धक्का देणारं.. अगदी खरं सांगायचं तर हा लेख गमावला नसल्याचा आनंद जास्त आहे. हाच लेख मी माझ्या इंग्रजी ब्लॉगवर लिहिला आहे.. पण त्यात केवळ तिसऱ्या भेटीपर्यंतच लिहिलेले आहे चौथ्या भेटीत काय करायचे ठरवले आहे ते लिहिले होते. मनातली बोच लिहिण्याने कमी होईल वाटले होते म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न होता, जो हरपला असे झाले होते. जे होते ते भल्यासाठीच.. नाही का? कुठे मी त्या मुलांना शिकवायला निघाले होते, काही शिकायला मिळेल की नाही याबद्दल साशंक मनाने.. आणि कुठे तिथून एका चिमुरड्याकडून इतका मोठा धडा शिकून स्वतःची खरी ओळख, खरी पातळी समजून चुकलेय ! इथून पुढे अशा चुका होऊ नयेत हीच काळजी घ्यायचा प्रयत्न करू शकते, जो करायचाय..बस्स !