प्रिय प्रदिप,
ब्राह्मण मध्ये १. ब्रा = ब् + र् + आ २. ह्म = ह् + म् + अ आणि ३. ण = ण् + अ अशी तीन अक्षरे आलेली आहेत. असे आपण म्हटले आहे. पण मराठीने 'ह्म' असे जोडाक्षर भाषेत घेतलेले नाही. मराठीने 'म्ह' जोडाक्षर स्विकारले आहे. मराठीने 'ह्म' च्या ऐवजी 'म्ह' का स्विकारले याची कारणे पुढीलप्रमाणे मांडता येतात. सविस्तर माहिती 'मराठी अक्षर सिद्धांत' या पुस्तकात दिलेली आहेत.
मराठीने केवळ विवृत्त अक्षररचना स्विकारलेली आहे. ज्या अक्षराचा शेवट स्वराने होतो त्याला विवृत्त अक्षररचना म्हणतात. 'स्वर', 'व्यंजन + स्वर', 'स्वर + स्वर' असे मराठी विवृत्त-अक्षर बनते. अनुक्रमे उदाहरण : 'आ', 'प्-व्यंजन + आ = पा', 'अ + इ = ऐ'
संस्कृत भाषेने संवृत्त आणि विवृत्त अशा दोन्ही अक्षररचना स्विकारलेल्या आहेत. ज्या अक्षराचा शेवट व्यंजनाने होतो त्याला संवृत्त अक्षररचना म्हणतात. संवृत्त अक्षररचना 'स्वर + व्यंजन', 'व्यंजन + स्वर + व्यंजन' अशा दोन रचनेतून बनते. अनुक्रमे उदाहरण : 'अ + च्-व्यंजन = अच्', 'स्-व्यंजन + अ + त्-व्यंजन = सत्'
या शिवाय मराठीने 'जोडाक्षरातील ह' व 'ह-महाप्राणाचा' वापर यात समान धोरण स्विकारलेले आहे. या दोन्ही ठिकाणी 'ह' किंवा 'ह-महाप्राण' शेवटी येतो. कृपया पुढील दोन उदाहरणे पहा.
१) 'जोडाक्षरातील ह' : 'ब्राह्मण' हा संस्कृत शब्द मराठीत 'ब्राम्हण' असा लिहिला व उच्चारला जातो.
२) 'ह-महाप्राण' : 'क + ह-महाप्राण = ख', 'ग + ह-महाप्राण = घ', 'ट + ह-महाप्राण = ठ', वगैरे.
मराठी भाषकाला 'ब्राह्मण' मधील केवळ 'ह्मण' उच्चारता येत नाही. त्याला 'म्हण' शब्द उच्चारता येतो. 'म' ला 'ह' नंतर जोडणे ही मराठी भाषेची प्रवृत्ती ठरते. लिपीतील अक्षर व भाषेतील अक्षर यात असा फरक असतो. देवनागरी लिपी 'संस्कृत व मराठी' दोन्ही भाषा वापरतात. लिपी व भाषा यात असा फरक नक्की का येतो ते त्यातील अक्षराचे विभजन 'संवृत्त आणि विवृत्त' गटातून केल्यावर नीट उमगते. कागदावर देवनागरीतून अक्षर लिहिता येते म्हणजे ते अक्षर भाषेला स्विकारता येतेच असे नाही. उदाहरण : मानवाला 'क्य' जोडाक्षर लिहिता व उच्चारता येते पण 'य्क' जोडाक्षर लिहिता आले तरी सातत्य साधत उच्चारता येत नाही.
'संवृत्त आणि विवृत्त' हे दोन नवीन शब्द मी मराठीत आणले आहेत. या शब्दांच्या व्याख्यांमुळे 'संस्कृत व मराठी' यातील अक्षराचा फरक जाणता येतो.
संस्कृत मधील 'विद्यार्थिन्' शब्दाची अक्षर-फोड (व् + इ) + (द् + य् + आ) + (र् + थ् + इ + न्) किंवा (व् + इ) + (द् + य् + आ + र्) + (थ् + इ + न्) अशी करता येते. यातील (र् + थ् + इ + न्) किंवा (द् + य् + आ + र्) हे जोडाक्षर ठरते. ज्यात (थ् + इ + न्) आणि (य् + आ + र्) ही 'व्यंजन + स्वर + व्यंजन' अशी अक्षरे ठरतात.
तसेच 'ब्राह्मण' याची फोड (ब् + र् + आ + ह्) + (म् + अ) + (ण् + अ) किंवा (ब् + र् + आ) + (ह् + म् + अ) + (ण् + अ) अशी होते. मराठीत (ह् + म् + अ = ह्म) नसतानाही मराठी भाषकाला 'ब्राह्मण' उच्चारता येतो. म्हणजे (ब् + र् + आ + ह्) ही फोड अधिक योग्य ठरते. यात (र् + आ + ह्) हे 'व्यंजन + स्वर + व्यंजन' असे संस्कृतचे संवृत्त अक्षर ठरते. आणि संवृत्त अक्षररचनेचे, 'व्यंजन + व्यंजन + स्वर + व्यंजन' असे 'ब्' ने साकारलेले जोडाक्षर ठरते.
'भाषेने स्विकारलेला उच्चार व भाषेने स्विकारलेली अक्षररचना' यात संस्कृत व मराठी अक्षरात कसा व कोठे फरक आहे हे प्रथमच मी माझ्या 'मराठी अक्षर सिद्धांत' या पुस्तकात मांडले आहे. यातून आजपर्यंत न सुटलेल्या गोष्टी स्पष्ट होतात.
दोन अक्षरातील तटस्थपणा, शिरोरेषेत मुद्दाम सोडलेल्या मोकळ्या जागेतून साकारणे मराठीला विवृत्त अक्षररचनेमुळे शक्य आहे. संस्कृतला ते संवृत्त अक्षररचनेमुळे शक्य नाही. संगणकातील मराठी फॉण्ट रचना 'प्रत्येक अक्षर मोकळे दाखवता' येणारी असावी. माझ्या 'gangal' फॉण्ट मध्ये मी ते आणले आहे. मला ईमेल केल्यास तो फॉण्ट मी आपल्या सर्वांना मोफत पाठविन. आपण तो वापरून पडताळा घ्यावा.
आपली मते कळवा. सर्व भाग अपुऱ्या जागेत मांडणे यात मर्यादा येतात हे कृपया लक्षात घ्यावे.
आपला,
शुभानन गांगल