देवराई मी पाहिला आणि मलाही आवडला. कुठेही तर्काला सोडून केलेली गोष्ट नाही. सोनाली कुलकर्णीचा अभिनय चांगला आहे, मात्र तो चित्रपट पुढे सरकायला लागल्यावर.  चित्रपटाच्या सुरुवातीचा तिचा अभिनय, विशेषतः डॉक्टरांना तिच्या भावाविषयी ती सांगत असते तेव्हाचं तिचं चाचरत बोलणं मला पटलं नाही. संवाद उत्तम आहेत, मात्र तिच्या बोलण्याची पद्धत आवडली नाही. हे बोलताना अस्वस्थता दाखवण्यासाठी तिने चाचरल्याचा अभिनय केला असावा, मात्र ती अस्वस्थता तिने काही चूक केली आहे आणि ती कबूल करताना अस्वस्थता यावी अशी वाटते, भावाविषयीच्या कळजीने आलेली अस्वस्थता वाटत नाही, असे माझे मत. चित्रपटात उत्तरोत्तर मात्र तिचा अभिनय सकस होत गेला आहे. भावाची शुश्रुषा, नवऱ्याच्या वेळा सांभाळाणे, मुलासाठी वेळ देणे आणि हे सगळं करताना कुठेही आक्रस्ताळेपणा न करणे हे तिने फार छान दाखवले आहे. अश्विन चितळेचा रुसल्यासारखे भाव चेहऱ्यावर सतत ठेवून केलेला अभिनय मला काही खास वाटला नाही. श्वास मध्येही तो असाच कायम रुसल्यासारखा दिसतो. अतुल कुलकर्णी, तुषार दळवी आणि मोहन आगाशे उत्तम. "मानसिक आजार आणि पर्यावरण या दोन्ही विषयांवर प्रेक्षकाला विचार करायला लावतानाही हा चित्रपट क्षणभरही प्रचारकी थाटाचा वाटत नाही, हे महत्त्वाचे." ह्या वाक्याशी पूर्णतः सहमत. परीक्षण आवडले.