कांदळकरसाहेब,
ही गझल नाही...कोणत्याही रचनेला गझल असे संबोधू नका. आधी कवितांचे प्रकार समजून घ्याल, तर बरे होईल...
सचिन,
तू पुन्हा तुझ्या पहिल्याच वाटेकडं निघालेला आहेस...त्या वेळी मुक्तछंद होता आणि आता तू आकृतिबंध केवळ बदललेला आहेस. छंदात लिहिणं एवढं सोपं नसतं, मित्रा. तुला नाउमेद करण्यासाठी मी हे अजिबात लिहीत नाही. तू अधिकाधिक चांगल्या छंदोबद्ध कविता लिहाव्यास हीच पोटतिडीक हे लिहिण्यामागं आहे. तू छंदात लिहायला सुरुवात केलीस, तसा प्रयत्न सुरू केलास हे चांगलंच झालं, हे मी मागं तुला एका प्रतिसादात सांगितलंच आहे. पण यमकं जुळवत काही रचणं म्हणजे छंदात लिहिणं (किंवा आता आपल्याला छंदात लिहिता येऊ लागलं, असं समजणं) नव्हे, हे नीट ध्यानी ठेव. छंदात लिहिताना संबंधित रचनेला लय हवी, गेयता हवी, वृत्तबद्धता हवी. या किमान गोष्टी तरी हव्यातच हव्यात. केवळ यमके पुरेशी नाहीत. या गोष्टी तुझ्या या रचनेत आहेत का, हे तुझे तूच ताडून पाहा. य़ा रचनेतील अंतरा, निखारा य़ा कल्पना चांगल्या आहेत; पण दुखणी हजार, रखरखते उन्ह, वेळ कातराची याबाबत काय ? मुळाच तुला एखादी कल्पना मांडायची असेल तर तिचे आकलन तुझे तुलाच पुरेसे आणि निःसंदिग्धपणे व्हायला हवे. (तरच तू ती इतरांना नीट सांगू शकशील ना ?)
साहित्यातील कविता या प्रकारावर तुझे निस्सीम प्रेम आहे (तसे जाणवते), म्हणून तुला (माझ्या मगदुरानुसार) `युक्तीचा चार गोष्टी`सांगत आहे. तू हे सारे योग्य तऱ्हेने घेशील, याची खात्री आहेच मला.
शुभेच्छा.