विरामद म्हणजे विश्रामदायक हे मान्य. पण हे एक 'आरामशीर' अशा अर्थाचे विशेषण होईल. शिवाय त्याचा अर्थ शेवट करणारा असाही होईल. सर्वच फर्निचर आरामासाठी नसते. जसे, कपाट, शिडी, चहाचे तबक ठेवायची तिपाई, वगैरे. म्हणून फर्निचरला जो शब्द शोधायचा तो फर्निचर इतका सोपा आणि त्यातल्या त्यात बरा असायला हवा. संस्कृतमध्ये उपस्कर हा एक शब्द आहे. अर्थ:सामग्री; गृहोपयोगी (त्या काळात वापरायची)उपकरणे(केरसुणी, सूप, मुसळ इ.). हल्ली हा शब्द एक्विपमेंट अशा अर्थी वापरतात. उदा. उपरी उपस्कर(ओव्हरहेड एक्विपमेंट). हा शब्द खरेच छान आहे.
आणखी एक शब्द-संभार. अर्थ संग्रह,साठा. केशसंभार, पुष्पसंभार यात हा अर्थ आहे. फर्निचर हा एक प्रकारचा संग्रहच असतो. संभारचा दुसरा अर्थ तयारी. फर्निशच्या अर्थाशी जुळणारा.आणखी अर्थ-सामग्री, साहित्य आणि परिपूर्णता/सुसज्जता. फर्निश्ड गुड्सच्या जवळपास पोचणारे अर्थ̱. घरसंसार या मराठी-संस्कृत गंगाजमनी शब्दाप्रमाणे घरसंभार हा नवा शब्द घरगुती फर्निचरसाठी 'फिट्ट' बसेल. कार्यालयीन फर्निचरसाठी फक्त संभार. एवंच, 'फर्निचर' जर वापरायचाच नसेल तर 'संसार'शी जुळणारा 'संभार' सर्वोत्कृष्ट.