गेल्या प्रेमदिवसाच्या (व्हॅलेन्टाइन डे) सुमारास मी पोस्टात गेलो. तिथे एक पन्नाशीचा, डोक्यावर टक्कल पडलेला माणूस बऱ्याचशा व्हॅलेन्टाइन डे भेटकार्डांवर गुलाबी रंगाची हृदयाच्या आकाराची स्टिकर्स लावीत होता.  नंतर त्याने खिशातून सुगंधी फवारा काढला आणि त्या शेकडो भेटकार्डांवर ते अत्तर फवारले. हा प्रकार बघून मला उत्सुकता वाटली. मी जवळ जाऊन त्याला विचारले, "काय हो, तुम्ही ह्या वयात इतकी सारी प्रेमदिवसाची भेटकार्डे कुणाला पाठवताय?"

माझ्याकडे एक कटाक्ष टाकून तो पुन्हा आपल्या कामात गढला. त्या साऱ्या भेटकार्डांवर 'I Love You, Guess Who!'  चे ठप्पे मारत त्याने स्पष्टीकरण दिले, "अशी एक हजार भेटकार्डे मी प्रेमदिवसाला दर वर्षी पाठवत असतो."

"पण कुणाला?" 

"टेलिफोन डायरेक्टरीमधून कुठलेही पत्ते निवडतो." ठप्पे मारत तो म्हणाला.

"पण कां" ह्या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला "अहो मी वकील आहे, आणि घटस्फोटाचे खटले चालवणे हा माझा पोटापाण्याचा उद्योग आहे."