राजसाहेब नमस्कार,
आपण म्हटलात त्याप्रमाणे 'लेख रस्त्यावर घसरतो' वास्तविक पूर्ण लेखात रस्त्याविषयी कोणतेही विधान मी केलेले नाही. प्रश्न होम सिकचा. स्वतःच्या राज्याविषयी ममत्व वाटण्यातून दुसर्‍या राज्याच्या द्वेष करण्याचा माझा स्वभाव नाही. माझा मुख्य मुद्दा वाहतुकीचे नियम पाळण्याचा आहे. महाराष्ट्रात, किमान मी मी ज्या मूळ नाशिक शहरातील आहे, तेथे तरी नक्की आहे. पण एकूणात मी जो महाराष्ट्र पाहिलाय त्या तुलनेत नियम पाळण्याचं प्रमाण इंदूरमध्ये नक्की कमी आहे. (आपण ज्या राज्यांत आपण राहिल्याची यादी दिली आहे, त्यात दुर्देवाने मध्य प्रदेश नाही.)

इंदूरमध्ये हिंदी संस्कृती 'हावी' होण्याचा मुद्दा. इंदूरमध्ये हिंदी संस्कृतीच्या प्रसाराविषयी किंवा प्रभावाविषयी माझ्या म्हणण्याचा विपरीत अर्थ आपण घेतल्याचे जाणवते. इथे आल्यानंतर इथल्यासारखेच रहायचे हे ठीक आहे. त्यात दुमत असायचे कारण नाही. परंतु, मुळात मराठी माणूस बहुतांश नियम पाळणारा, कायद्याला भिणारा स्वतःला काही सामाजिक दायित्व आहे, असे मानणारा आहे. (याचा अर्थ बाकीचे सगळे कायदे तोडणारे असे नाही. पण हे एक जनरल मत आहे.) हे पाहिल्यानंतर तशीच अपेक्षा इंदूरमध्ये रहातानाही असते. पण हिंदी लोकांत नियम तोडण्याची वृत्ती त्या तुलनेत जास्त आहे. (आठवा काही दिवसांपूर्वीचे दिल्लीच्या उपराज्यपालांचे विधान) त्या अर्थाने हिंदी संस्कृती 'हावी' असल्याचा मुद्दा आहे.

आता लाच घेण्यास प्रोत्साहन देण्याचा मुद्दा. लाच घेण्याचे समर्थन मी करत नाही. पण वाहतुकीचे नियम तोडल्यास दंड होईल, किंवा पोलिसाला पैसे द्यावे लागतील या भावनेने नियम पाळणारे बरेच लोक असतात. तसे इथे दिसत नाही, हेच येथे मला दर्शवायचे होते. (यातून मी माझ्या वरच्या मुद्याला विपरीत मुद्दा मांडतो असे कृपया म्हणू नका. हेही पुन्हा एक सर्वसाधारण निरिक्षण आहे.)

गाडी अडवण्याचा मुद्दा. माझी गाडी अडवली नाही हे मला आजही अभिमानस्पद वाटत नाही. कारण मुळात आपल्या राज्यात आलेली गाडी नक्की त्या मालकाचीच आहे की चोरून वगैरे आणलेली आहे, हे तपासणे गरजेचे आहे. नुकतीच मटामध्ये एक बातमी वाचली. त्यात केरळमध्ये महाराष्ट्रातील अनेक गाड्या विकल्याचे एक रॅकेट उघडकीस आल्याचे म्हटले आहे.

राहिले इंदूरविषयीचे अनुभव लिहिण्याचे. इंदूरच्याच वैशिष्ट्यांवरील दोन लेख 'इये इंदुर नगरी' व 'खवय्यांचे इंदूर' हे येथेच मी लिहिले आहेत. ते सकारात्मकच आहेत. यानंतरही इतर लेख लिहिण्याचा मानस आहे. त्यातून तुम्हाला अपेक्षित ते वाचायला मिळेल.

तुम्ही भारतात ज्या प्रांतांत राहिलात, त्या सगळ्या प्रांतातील लोकांबरोबर मी सध्या काम करतो आहे. उदा. बिहारी, उत्तर प्रदेशी, पंजाबी, बगाली, आसामी, ओरीया, गुजराथी, राजस्थानी शिवाय दक्षिणेतील काही राज्यांच्या लोकांशी नियमित संपर्क आहे. या सगळ्यांशी माझे वैचारीक आदानप्रदान अतिशय चांगले होते आहे. अगदी स्थानिक संस्कृती, साहित्यापासून परंपरा, राजकारण या सगळ्या मुद्यांवर आमची मस्त चर्चा होते.

ता. क. मराठी मंडळांत न जाता स्थानिक लोकांत मिसळण्याचा आनंद घेण्याविषयी वगैरे.  माझा स्थानिक मराठी लोकांपेक्षा इतरांबाबतचा (आतापर्यंतचा) अनुभव अतिशय चांगला आहे. त्यांच्याइतके सहकार्य (दुर्देवाने) मराठी लोकांनीही केलेले नाही.