मुंबईवर ओढवलेल्या आपत्ती आणि मुंबईकरांनी चोवीस तासात ताठ कण्याने वगैरे परत उभे राहणे याचे वरचेवर उदात्तीकरण केले जाते. अर्थात असे प्रसंग वरचेवर येण्याचे मुंबईवरचे दुष्टचक्र सुटत नाही , हा वेगळा विषय. अशा मुंबईकरांना (शक्यतोवर बाहेरुनच) सलाम करण्याआधी,अगदी त्रिवार वंदन वगैरे करून डोळ्यात पाणीबिणी आणण्याआधी मुंबईकर असा धैर्याबिर्याचा विचार करतो का हे खुद्द मुंबईकरांनाच विचारावे. मुंबईतल्या स्फोटांनंतर हे 'हॅटस ऑफ' वगैरे वाचून मुंबईतल्या काही लोकांशी मी याबाबत बोललो. त्यांची मते विचारात घेण्यासारखी आहेत. एकजण म्हणाला, 'अरे, कसली दुर्दम्य आशाशक्ती आणि कसलं काय? इथं मुडद्याच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलो नाही, तर मागचा माणूस आपला मुडदा पाडेल अशी परिस्थिती आहे.आणि मुंबईकरांना मरणाची भीती काय? जगणं आणि मरणं यात फार फरक असेल तर मरणाला भितो माणूस! इथे चालत्या रेल्वेतून पडून दर वर्षी शेकड्यांनी माणसं मरतात! एखादं अस्वल वाळवीचं वारुळ फोडून शेकड्यांनी वाळव्या खातं आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या वाळव्या परत पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात, म्हणून 'काय ती वाळवीची जिद्द!' म्हणून कंठ दाटून येण्यातला हा प्रकार आहे! मुंबईला आणि मुंबईकराला भूतकाळ नाही, आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही. आहे तो फक्त आज! आणि हा आज ओरबाडून घेताना शेजारी रक्ताचा सडा पडला असेल तर मुंबईकराला त्याचे काही देणेघेणे नाही, कारण कुणास ठाऊक, उद्याच्या सड्यातले रक्त कदाचित आपले असेल!"
आणि घरात मेतकूट भात खाताना चवीला जरा इतिहासाचे लोणचे घेतले की बरे असते. शेवटी माणसाला सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तो स्वतःच, हे जरा पचवायला अवघड जाते. दुसऱ्या दिवशी निधड्या छातीने वगैरे लोकलची वाट पाहणाऱ्यांचा कुणीतरी सर्व्हेच करायला हवा होता. 'काय बुवा, काल इतके भयानक स्फोट झाले आणि तरीही आज तू कामावर चालला आहेस, तुला भीती वाटत नाही का?' असे विचारायला हवे होते. शंभरातल्या नव्वदांचे उत्तर पचवण्याची आपली मानसिक तयारीच नाही.
कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती.
हे बाकी खरे. ही भूक हीच खरी शक्ती. जिवंत राहण्याची भूक - जी कुठल्याही सजीवात असते. यासाठी मुंबईसारख्या बिनचेहऱ्याच्या शहराला , आणि त्याहून बिनचेहऱ्याच्या मुंबईकराला सलाम करायचाच असेल, तर पाडगावकरांसारखा करावा. इतर सगळे भाबडेपणाचे वाटते.