हे सगळे विश्लेषण बिनचूक, 'धारदार, थंडगार सुरी फिरवत' वगैरे केलेले आहे, ह्याबद्दल वाद नाही. हे धैर्य येते कुठून? तर आजची जगायची धडपड ह्य एकाच तीव्र जाणिवेतून, हेही कुणीच अमान्य करत नाही. आणि खरे तर त्याच्यात लाज वाटण्यासारखेही काही नाही.
पण हे सगळे पूर्ण ठऊक असूनही मुंबईकरांच्या रेसिलियन्सला (म. प्र. श. ?) दाद द्यायची ती अशा संदर्भातून की अशाच दुर्घटनेत इतर अनेक शहरे कशी वागली असती? एरव्हीच सुस्त कारभार असलेली उत्तर भारतातली शहरे अशा दुर्घटनेतून किती तत्परतेने सावरली असती? 'हरेक जिस्म घायल, हरेक रूह प्यासी, निगाहों मे उलझन, दिलों मे उदासी' हे काही मुंबईपुरतेच खरे नाही, ते तितकेच दिल्ली, पुणे, न्यूयॉर्क, लंडन, कोल्हापूर, अहमदाबाद, इंदौर इ.इर्वच शहरांत तेव्हढेच लागू आहे. मग 'काल झाले ते झाले, पण आज मला परत उठलेच पाहिजे, कामाला लागलेच पाहिजे' ही तीव्र टोकदार जाणिव अशा सगळ्या ठिकाणी असेलच असे नाही, (भारतातील काही शहरांबद्दल तर तशी ती नकीच नाही, असे सांगला येईल). म्हणून मुंबईकरांच्या विजीगीषू वृत्तिला सलाम करायचा.
जोरदार पाऊस पडून गेलेला असतो, सगळीकडे पाणीच पाणी झालेले असते, तरीही 'किंचीत' निवळल्यावर मुंबईकर आपापल्या उद्योगाला हमखास लागतात. ह्यात ज्यांचे पोट रोजीरोटीवर आहे, तेच आहेत असे नाही. अगदी शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लोकलने धडपडत जाणारे असंख्य मध्यमवर्गीयसुद्धा आहेत. भारताच्या दुसऱ्या कुठल्याही शहरात हे होत नसावे. हे स्वतः अनुभवले की त्यातली बोच जाणवते.
शहरे सगळीच थोड्याफार फरकाने भावनाशून्यच असतात. जितके शहर मोठे, तितके तिथे भावनांना महत्त्व कमी आणि ह्यात वावगे काही नाही. एकविसाव्या शतकात 'गुण्यागोविंदाने, एकमेकांची विचारपूस करत सगळे शहरवासी नांदू लागले' असे चित्र ज्या शहराला लागू आहे, त्याला फक्त एक टूरिस्टांना दाखवण्यास प्रेक्षणीय स्थळ एव्हढीच किंमत असेल.
ह्या सगळ्या मानवनिर्मीत दुर्घटना टाळता येतील का, हा प्रश्न आहेच. पण त्यात मुंबईकर एकटाच काही जबाबदार आहे, असे नाही. स्वतःवर जे काही भागधेय लादले गेले आहे, त्याच्या चौकटीत तो ज्या 'उत्साहाने' वावरत असतो, तो निश्चीतच उल्लेखनीय आहे.