दोहींचे बिऱ्हाड एकाच वाड्यात. रमाकाकूंची नमू आणि ठमाकाकूंची चमू याही दोघी एकाच शाळेत. एकदा शाळेत होते स्नेहसंमेलन. नमूने नाच सादर केला, सर्वाना आवडला, टाळ्यांचा कडकडाट झाला व तिला पारितोषिक मिळाले. दोघी घरी परत आल्या. रमाकाकू आणि ठमाकाकू दोघी बाहेरच उभ्या होत्या. चमूने आपल्या आईला, म्हणजे ठमाकाकूंना सांगितले की नमूने कसलासा फालतू नाच केला आणि पक्षपाताने तिला बक्षिस दिले गेले. झालं! ठमाकाकूंनी तोंडाचा जो काही पट्टा सोडलाय म्हणता!
म्हणाल्या ' हॅ, कसले मेले ते नाच? चांगल्या घरच्या मुली मुळी नाचतच नाहीत. आणि कसले ते दळभद्री लोक? मेले टाळ्या वाजवतात आणि शाळावाल्यांनासुद्धा काही अक्कल नाही; तेही मेले परितोषिक देतात! जळ्ळ मेलं ते लक्षण. काय ती नमी शेफारलये, मेली स्वतःला काय रावबहादूरीण समजते की काय? चांगले कान लांब केले पाहिजेत उपटून'
इकडे रमाकाकू आणि नमू गालातल्या गालात हसल्या आणि आपापसात नेत्रपल्लवी करीत आपल्या घरात निघून गेल्या.