असे विश्लेषण, कुणी त्याला चिरफाडही म्हणतील, केलेले काही लोकांना आवडणार नाही, हे गृहीत धरलेलेच आहे. मुळात धैर्य, तत्परतेने सावरणे वगैरे कल्पनांमध्येच घोटाळा आहे. बेफिकिरी, कोडगेपणा आणि पैशाची लालसा या गोष्टींवर घातलेली ही पांघरुणे आहेत. मुळात एखादे संपूर्ण शहर असे एखाद्या प्रेरणेने झपाटलेले असते असे समजणे हा बालीशपणा आहे. पण आपल्याला सतत नमस्कार करायला एखादे देऊळ पाहिजे असते. आपण संवेदनशील आहोत हे दाखवण्यासाठी 'ही पहा आमची एकजूट, हे पहा कोसळणाऱ्यांना सावरणारे आमच्या समाजाचे मजबूत हात, हा पहा आमचा थोर सांस्कृतिक वारसा, हे पाहा शिवरायांचे आणि राणी लक्ष्मीचे थोर वंशज' अशी टिपे गाळणे आपल्याला फार आवडते. एकंदरीतच चिकित्सेला विरोध आणि दिसल्या दगडाला भंडारा फासून त्याचा उदोउदो हा सगळ्या समाजालाच लागलेला रोग आहे, त्याला कोण काय करणार?
आता त्यावर 'चांदोबा' दर्जाची उदाहरणे देऊन तरी काही फरक पडतो का, ते पहायचे!