अवांतर:
'उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध' या
वाक्याने निदान पुणेकरांचा तरी थोडा गैरसमज होऊ शकतो. पुणेकर मंडई म्हणजे
भाज्या मिळण्याचे ठिकाण समजतात. तिथे उपनिषद संहिता उपलब्ध आहे याचा अर्थ
भलताच होईल
मंडई ऐवजी 'बाजारात' असे चालेल का?
चालायला हरकत नसावी, पण मुद्दाम बदलण्याची गरजही नसावी. 'मंडई' या शब्दप्रयोगाने पुणेकरांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम भाजीपाल्याच्या आणि फळांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीचे केंद्र जरी उभे राहत असले, तरी 'मंडई' हा शब्द 'मार्केट' अर्थात 'बाजारपेठ' अशा अर्थी बऱ्यापैकी सर्वमान्य, सर्वपरिचित (अगदी पुणेकरांनासुद्धा, इन्क्लूडिंग, फॉर्मरली, युअर्स ट्रूली) आणि प्रचलित आहे. किंबहुना,'महात्मा फुले मंडई'तील 'मंडई' हे 'लॉर्ड रे मार्केट'मधल्या 'मार्केट'चे पारंपारिक व शब्दशः भाषांतर आहे.
तसेही पुण्याच्या मंडईत व्यापार हा जास्त करून भाजीपाल्याचा आणि फळांचा होतो हे जरी खरे असले, तरी त्याव्यतिरिक्त इतर व्यापार होतच नाही, असेही नाही. कमी प्रमाणात होतो, इतकेच. माझ्या लहानपणी मी मंडईत भाजीपाल्याव्यतिरिक्त गुलाल, पिंजर, हळद इत्यादींचे ढिगारे व्यापाराकरिता मांडून ठेवलेले बघितल्याचे आठवते. कदाचित आजही भाजीपाल्याव्यतिरिक्त या किंवा इतर वस्तूंचा व्यापार तेथे होत असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
सारांश, 'मंडई' म्हणजे 'बाजारपेठ'; 'भाज्या मिळण्याचे ठिकाण' नव्हे. अर्थात पुण्याच्या महात्मा फुले मंडईत उपनिषदांचा (किंवा एकंदरीत पुस्तकांचाच) व्यापार जरी होत नसला, तरी अप्पा बळवंत चौकास पुस्तकांची (किंवा किमानपक्षी शालेय/महाविद्यालयीन पुस्तकांची) मंडई म्हणण्यास कोणाची काही हरकत असण्याचे काही कारण दिसत नाही.
अवांतर:
जर केवळ 'उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध' या शब्दप्रयोगाने पुणेकरांचा गैरसमज होऊन त्यांना भाज्यांच्या पोत्यांशेजारी मांडलेल्या उपनिषदांच्या थप्प्यांचे चित्र दिसू शकते म्हणून 'मंडई' हा शब्दप्रयोग टाळायचा असेल, तर मग काही मराठीभाषिक समाजांत 'बाजार' या शब्दालाही काही वेगळा अर्थ प्राप्त होतो. मग 'उपनिषद संहिता बाजारात उपलब्ध ' म्हटल्यावर प्रथम समोर दिसेल त्या कोळिणीच्या टोपलीतील मासळी हाताने भराभर बाजूला करून आत कोठे एखादे उपनिषद वगैरे दडवले आहे का याचा शोध घ्यायचा, की त्या टोपलीतील एकूण एक माशांची पोटे चिरून आत कोठे एखाद्या माशाच्या पोटात एखादे मायक्रोफिश (microfiche - fishच्या पोटातील fiche ही एक गमतीदार कल्पना आहे!) आवृत्तीतील उपनिषद सापडते का ते पहायचे?
तात्पर्य, कोणताही शब्दप्रयोग वापरला तरी कोणाला ना कोणाला त्यातून एखादा अनपेक्षित अर्थबोध होण्याची शक्यता ही नेहमीच असते. म्हणून शहाण्याने 'दुसऱ्याला यातून काय अर्थबोध होईल' म्हणून आपले शब्दप्रयोग बदलू नयेत.