माझ्या आठवणीप्रमाणे एस.टी.चा रंग पूर्वी केशरी होता. तेव्हा कोणी तिला "केशरी डबा" म्हणत
नव्हते. शिवसेनेची जेव्हा सत्ता गेली तेव्हा नव्या काँग्रेस राजवटीने केशरी रंग शिवसेनेचा म्हणून
बदलला. त्याबरोबर शिवसेनेच्या काळात नेमणूक झालेले अनेक भ्रष्टाचार आणि खाबुगिरीपासून दूर
राहिलेले अधिकारीसुद्धा बदलले अशी वदंता आहे. असो.
एस.टी. हे महाराष्ट्रातील कानाकोपर्यात पोहोचलेले वाहन आहे. "गाव तेथे रस्ता आणि रस्ता
तेथे एस.टी." असे महाराष्ट्र सरकारचे धोरण होते ("एस.टी. भंगार डेपो तेथे भ्रष्टाचार" हे अजून
एक धोरण) .
आजही महाराष्ट्राच्या दुर्गम भागात लोकांना एस.टी. हाच सहारा आहे कारण अगदी ५
प्रवासी असले तरी एस.टी. वेळेवरच सोडली जाते. ह्या उलट फक्त फायद्यांच्या रस्त्यावरून
धावणार्या खाजगी बसगाड्या पहा. आधी बस अर्धी भरेपर्यंत लोकांना खोळंबवून ठेवतात
आणि नंतर रस्त्यात गिर्हाईक घेत घेत जातात.
दुसरे म्हणजे एस.टी. पंक्चर झाली तर जवळच्याच डेपोमधून दुसरी मागवतात. खाजगी
बसगाडी पंक्चर झाली तर प्रवाश्यांना वार्यावरच सोडून देतात. मग आपला वाली परमेश्वरच.
मूळात एस.टी.चे अपघात कमी होतात कारण चालकांना मिळणारी पुरेशी झोप. कोणत्याही
चालकाची कामाची वेळ ९ तासांपेक्षा जास्त नसते. समजा, एकाएकी चालकाला अस्वस्थ
वाटू लागले तर त्याच्याबदली दुसरा चालक पाठवतात. म्हणून एस.टी. चे अपघात कमीच
आणि अपघात झाला तर एस.टी. तील प्रवाश्यांना विमा संरक्षण आहे. ह्या उलट खाजगी
वाहनांच्या चालकांना पगार कमी आणि ड्यूटी १२-१३ तासांची. तसेच तिच बस सतत
धाववतात. त्या बसची तांत्रिक देखभाल क्वचित्. मात्र एस.टी. च्या बसला २-३ फेर्यांनंतर
डेपोत नेऊन तेलपाणी करतात.
खाजगी बसगाड्यांना तर कोणतीही आचारसंहिताच नाही आणि त्या सर्व आजी माजी
मंत्र्यांच्या असल्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?