खाली दिलेली काही 'विरोधाभासी' उदाहरणे न्यूज चॅनेल, काही उदाहरणे सिनेमा आणि काही वर्तमानपत्रांसाठी लागू आहेत.
(१) मल्लिकाचा 'मर्डर' रिलीज होणार होता तेव्हा मल्लीकाची विविध वाहिन्यांवर मुलाखत घेतली गेली आणि या चित्रपटात किती बोल्ड सीन आहे आणि असे बोल्ड सीन देणे योग्य आहेत का अशी चर्चा सुरू होती. मल्लीका 'ऊर' भरभरून बोलत ( की बडबडत?)होती आणि बाजूला एका फ्रेम मध्ये तोच सीन पुन्हा पुन्हा दाखवला जात होता. आता 'जे योग्य आहे का?' यावर चर्चा होते आहे तेच तुम्ही दाखवत आहात? विरोधाभास नाही का हा? मग वाटते की ही तर सिनेमाची जाहिरात आहे... वेगळ्या पद्धतीने केलेली...
(२) सद्दाम ला फाशी दिली गेली तेव्हा वर्तमानपत्रांत अशी चर्चा होत होती की, असे फाशीचे थेट प्रक्षेपण योग्य आहे का? पण मग तेच फाशीचे चित्र वर्तमानपत्रात छापले होते. ज्याला फाशी दिली गेली तो व्यक्ती गुन्हेगार जरी असला तरी मला एक सांगा, कुणी खरोखर मरतंय आणि आपण थेट प्रक्षेपण बघतोय, अरे आपल्या भावना इतक्या बधीर झाल्यात का? असे प्रक्षेपण कोवळ्या वयाची मुलेही बघत असतात... त्यांच्यावर काय परिणाम होईल. ( चित्रपटात आपण हिंसाचार बघतो, मान्य आहे, पण आपल्याला माहिती असते की हे शेवटी खोटे आहे...)
आताच कुठेतरी एका प्रेमीने आत्महत्या केली आणि प्रेमीकेला ते वेब कॅमेऱ्याने लाईव्ह दाखवले म्हणे... आता सगळ्या वाहिन्या ते प्रक्षेपण मिळवतील आणि दिवसभर तेच दाखवत बसतील ... म्हणजे सगळे आणखी बधीर होतील... चालू द्यात...!!
(३) केव्हातरी एकदा सोनाली बेंद्रे ने एका मासिकाच्या मुखपृष्ठावर अश्लील फोटो दिल्याबद्दल तीला कोर्टात बोलावले होते म्हणे. त्यावेळेस 'हाच तो अक्षेपार्ह फोटो!' असे म्हणून माध्यमांनी तो फोटो परत परत दाखवला/छापला. मग काय अर्थ राहिला त्या कोर्टातल्या खटल्याला? मधू- मिलिंद-साप फोटोबाबत सुद्धा तेच!
(४) चित्रपटातल्या ज्या दृश्याबद्दल / गाण्याबद्दल आक्षेप घेतला जातोय किंवा बंदी आहे, तेच पुन्हा वाहिन्यांवर दाखवत असाल तर काय अर्थ काय राहीला त्या बंदीला?
(५) जो कलाकार चित्रपटाद्वारे आपल्याला मुलांशी कसे वागावे ते शिकवतो, त्याचे खासगी जीवनात तो खरेच तसा मुलांशी वागत असेल का? ( अर्थात आपण तशी अपेक्षा तरी का करावी हा ही प्रश्न आहेच की! )
(६) गुन्हेगाराने गुन्हा कसा केला हे 'नाट्य रुपांतर' करून दाखवण्याची खरंच काय गरज आहे? कुणासाठी ते रुपांतर करतात? गुन्हेगारांना प्रशिक्षण द्यायला? समजत नाही!
(७) दिल्लीमध्ये एका फॅशन शो मध्ये एका मॉडेलचे छातीवरचे सगळे वस्त्र गळून पडलेत म्हणे. असे ( वस्त्र गळणे /गाळणे ) योग्य आहे का अशी चर्चा झाली आणि सतराशे साठ वेळा ती गळलेली वस्त्रे आणि त्यामागची मॉडेल दाखवली गेली/ वर्तमानपत्रांत छापली गेलीत. एक मॉडेल ठेच लागून पडली तर तेही दाखवले गेले. ती नेमकी कशी पडली, तीच्या पायात काय अडकले, यामागे कुणाचा हात (की पाय?) आहे, ती पडली तेव्हा जमीनीशी किती कोनात पडली, सगळे दाखवा म्हणा! जर असेच आहे तर मी म्हणतो की सरळ अशी बातमी दाखवायला हवी की, 'असे घडले आणि ही घ्या त्याची क्षणचित्रे' ... योग्य की अयोग्य अशी चर्चा कशाला करता?