१) प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...

२) लेकरू ही अतिसुंदर कविता लिहिणाऱ्या ' श्वास स्वातीचा'  यांचा अपवाद वगळता अन्य सर्वच सुह्रदांनी माझी ही गंभीर कविता गांभीर्याने घेतलीत, मनापासून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल हार्दिक आभार. सुदैवाने, गंभीर कविता गंभीरपणेच घेणाऱ्यांची संख्या, तशी ती न घेणाऱ्यांपेक्षा, जास्त असल्यामुळे दिलासा आहे. खासकरून कविता आणि एकंदरच काव्यव्यवहार या बाबींकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या माझ्यासाऱख्या कवीला हा दिलासा जणू दुसऱ्या श्वासासारखाच...

३) नेत्रपल्लवी आणि आजानुकर्ण यांना...

य़ेथल्या चकव्यांत आता यापुढे जगणे नको !
ताणुनी आयुष्य सारे हे असे तगणे नको !
तोड माझी नाळ; मज तू ने पुन्हा उदरात ने !

कविता लिहिताना या कडव्याबाबत मनात असे काहीसे होते -
जन्मानंतर आईशी आपली नाळ तुटते.(केवळ शारीरिकदृष्ट्याच. कारण वयाने कितीही मोठे झाले तरी बहुतेकजण आई या व्यक्तीला विसरूच शकत नाहीत. मनाने तिच्याशी बांधलेलेच राहतात. काही अपवाद असतीलही कदाचित...). नवजाताचे जीवन स्वतंत्रपणे सुरू राहण्यासाठी नाळ तुटणे अत्यावश्यक आणि अपरिहार्यच. आईशी नाळ तुटते आणि हळूहळू आपल्या भोवतालाशी ती जुळू लागते. जुळते. (नाळ जुळणे या वाक्प्रचाराचा अर्थ येथे ध्यानी घ्यावा). पण वाट्याला आलेला भोवताल, तेथील वातावरण, माणसे यांच्याशी आपले आयुष्यविषयक व्यवहार आपल्या मनासारखे होतातच असे नाही. बहुसंख्य लोकांचे तसे होतच नाहीत. किंबहुना बरीचशी वर्षे अशीच मनाविरुद्ध जगावी लागतात. आपण चकव्यांत अडकतो. तिथल्या तिथेच घुटमळत राहतो. नवी वाट सापडत नाही. साचलेपणा येतो. त्यातूनच मग ताण-तणाव हेही अटळच. मग हे असे तणावपूर्ण, ताणलेले आयुष्य किती दिवस ताणत राहायचे ? केवळ जगण्यासाठी आणि तगण्यासाठी हा त्रास किती सहन करायचा ? (अर्थात मरेपर्यंत करावाच लागतो !). तेव्हा या भोवतालाशी माझी (नाइलाजानेच) जुळलेली नाळ तोड, असे कुणाला सांगणार ? आईलाच. (तिनेच तर नाळ तोडून आपल्याला या असुरक्षित, नकोशा जगात सोडून दिले आहे...) तेव्हाही तूच नाळ तोडलीस, मग आताही येथली, या जगाशी जुळलेली माझी नाळ तूच तोड. आणि पुन्हा तुझ्याच उदरात घे. पदरात घे. तेथे चकवे नसतील. ताण-तणाव नसतील. असेल ती केवळ सुरक्षितता. ऊब.
या कडव्यातून असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न आहे. (प्रयत्नच तो! फसला असावा!!). तोडऐवजी जोड हा शब्द अजिबातच अभिप्रेत नाही.

पुन्हा एकदा सगळ्यांचेच मनापासून आभार. असाच लोभ राहू द्यावा.

आपला,
प्रदीप कुलकर्णी