कोणत्याही व कोणाच्याही व्यक्तिगत वादात न पडता ह्या विषयावर काही सर्वसाधारण (जनरल) विचार मांडावेसे वाटतात.
  1. जालावर लिहिणं आज इतकं सोपं झालं आहे की मूळ कवी काय अथवा विडंबनकार काय, कोणीही फारसं थांबायला तयार नसतात. जालपूर्व काळात आपली कविता (वा कोणतेही ललित लेखन) प्रसिद्ध व्हावे असे वाटत असल्यास ते असंख्य मासिकांकडे पाठवावे लागायचे. बहुतेक ठिकाणाहून ते "साभार परत" यायचे. कधीतरी नशीब फळफळलं किंवा एखाद्या उप-उप-संपादकाचा वशिला लावता आला तर ती छापून यायची. त्यानंतर तीस प्रत्यक्षात किती जण वाचायचे देव जाणे. मुळात काव्य वाचणारे गद्य वाचणाऱ्यांपेक्षा खूपच कमी. वाचल्यावर त्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणारे अत्यल्प. कागद आणि लेखणी हातात घेऊन, कवितेवर अभिप्राय लिहून तो पोस्टाने मासिकास पाठवणारे गुलबकावलीच्या फुलासारखे दुर्मिळ. बरं, अभिप्राय पाठवला तरी तो मासिकाच्या संपादकाने छापायला तर हवा. त्या मानाने जालावर लेखन सुचेल त्या क्षणी करता येण्यासारखं असल्यावर लिहिण्याची ऊर्मी आलेली मंडळी स्वतःस रोखून धरतील हे संभवत नाही.
  2. आपली कितीही इच्छा असली तरी जगातले सगळेच आपल्या मतांप्रमाणे वागत नाहीत हे कटु सत्य आहे. एकास जो विवेक वाटतो तो दुसऱ्यास वेळकाढूपणा वाटू शकतो. ज्याला शीघ्रकाव्य करायचे आहे तो करणारच. ज्यांना ते पसंत नाही त्यांच्याकडे 'दुर्लक्ष' हे अत्यंत प्रभावी शस्त्र आहेच की.बंदी आणणे हादेखील यावर उपाय नाही कारण कोणत्याही प्रकारे जालचावड्यांवर विडंबनांना मज्जाव केला तरी विडंबनकारांना  ब्लॉगस् उपलब्ध आहेतच. तेव्हा "जो जे वांछील तो ते लाहो"(लिहो/वाचो) असा विचार करणं बरं नाही काय?
  3. मूळ कविता मनात ताजी असताना त्याचे विडंबन वाचण्यात मजा येते ह्या सर्वसाक्षींच्या मुद्द्याशी मी सहमत आहे. कालांतराने केलेले विडंबन हा थोडासा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार होतो. अर्थात हे वैयक्तिक मत झालं व ते सर्वांना पटेल/पटावं असं नाही.
  4. मनोगतावर गेली काही वर्षं कविता लिहिण्याच्या अनुभवातून मला असेही जाणवले आहे की असे अनेक वाचक आहेत जे एरव्ही कविता वाचायच्या फंदातही पडले नसते परंतु विडंबन वाचल्यामुळे ते येऊन मूळ कविता वाचतात. विडंबित झाल्यामुळे जर माझ्या कवितेची वाचकसंख्या वाढत असेल तर मला आनंदच आहे. त्या निमित्ताने का होईना, ज्यांनी एरव्ही माझी कविता वाचलीच नसती अशा दोन-चार लोकांपर्यंत ती पोहोचते!
  5. विडंबन हाही एक प्रकारचा अभिप्राय आहे. आपली कला/रचना लोकांपुढे सार्वजनिक ठिकाणी मांडायचा एकदा कलाकाराने/लेखकाने निर्णय घेतला की मग येणाऱ्या सर्व प्रकारच्या अभिप्रायांसाठी तयार असावे लागते. साधक/बाधक, मुद्देसूद/बिनबुडाचे, गंभीर/टवाळ, स्तुतिसुमनं/टीकेचे बोचरे काटे - सारे गीतेत वर्णिलेल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे स्वीकारायचे असतात - निदान तसे दाखवायचे तरी असते. टीकेने, टवाळीने, विडंबनांने व्यथित होऊन आपल्या हळवेपणाचे जाहीर प्रदर्शन करणे हे टवाळखोरांना आपल्यावर अजून हल्ले करण्यास निमंत्रण देण्यासारखेच आहे. स्वभावाला औषध नसते, हळवेपणालाही नाही व टवाळखोरपणालाही नाही. मात्र आजच्या काळात हळवेपणा हा कमकुवतपणा, अव्यवहारीपणा समजला जाऊ लागला आहे, चेष्टेचा विषय ठरू लागला आहे हे नाकारता येत नाही.
  6. शेवटी मूळ काव्य असो वा विडंबन, जे ताकदीचे आणि प्रतिभासंपन्न असेल ते कालौघात टिकेल, बाकीचे वाहून जाईल. अंतिम निवाडा काळावर व वाचकांच्या अभिरुचीवर सोडून द्यावा.