वाचणाऱ्याचे दोन घटका मनोरंजन किंवा सद्यस्थितीवर रंजक भाष्य किंवा शाब्दिक कोट्यांसारख्या काव्यात्मक कोट्या या उद्देशाने केले जात असेल तर त्याला विडंबन असे नाव आहे अशी माझी समजूत एके काळी झाली होती. अत्र्यांनी केलेली विडंबनं ही काहीतरी विसंगती दाखवण्यासाठी केली होती असं माझं स्पष्ट मत आहे.
पण या संकेतस्थळावरची विडंबनं ही असा व्यापक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेली असतात असं मला वाटत नाही. विडंबकांच्या कंपूमध्ये माझंही नाव अंतर्भूत आहे या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे आणि तरीही मी हे विधान करते आहे कारण आजवर इथे वावरताना हीच गोष्ट प्रकर्षाने दिसलेली आहे. जी विडंबने वाचून खळखळून हसू यावं किंवा खरोखरीच मनोरंजन व्हावं अशीही काही उत्कृष्ट विडंबने मी इथे वाचली आहेत. तरी पण गेली काही वर्षे विडंबनांचा वापर शस्त्रासारखा होऊ लागलेला आहे. विडंबन जोवर काव्याचं होत असतं तोवर ते योग्य आहे पण जेंव्हा काव्याचं विडंबन होण्याऐवजी माणसांचं विडंबन होतं, वृत्तीचं विडंबन होतं तेंव्हा ते आपल्या मर्यादांच्या पलिकडे जातं असं माझं मत आहे. एखाद्यावर वार करण्याच्या उद्देशाने, त्याने कष्टपूर्वक केलेल्या कलाकृतीची मोडतोड ही सर्रास विडंबन म्हणून खपवली जाते आणि वर हा प्रकार खिलाडूपणे घ्यावा असा अनाहूत सल्ला त्या रचनाकाराला दिला जातो, एवढंच नाही तर त्या विडंबकाची पाठ थोपटून त्याच्या या वृत्तीला वारंवार उत्तेजन दिलं जातं तेंव्हा त्या प्रक्रियेला विडंबन म्हणावं का आणि त्या वृत्तीला पाठबळ द्यावं का हा प्रत्येकाने स्वतःला विचारण्याजोगा प्रश्न आहे. प्रतिस्पर्ध्याला खिजवून किंवा क्रिकेटच्या भाषेत स्लेजिंग करून विजय मिळवण्याला प्रोत्साहन दिलं जाणं माझ्या मते चूक आहे.
अर्थात जालविश्वात एकदा आपले काव्य प्रसिद्ध केले की त्यावर कोणी काय प्रतिक्रिया द्यावी हे सांगण्याचा अधिकार रचनाकाराला उरत नाही हे मला माहीत आहे. प्रतिसाद, प्रतिक्रिया या रचनेला द्याव्यात, विडंबनं रचनेची व्हावीत अशी माझी माफक अपेक्षा असते. ती पूर्ण झाली नाही तर तिकडे दुर्लक्ष करावं हे या संकेतस्थळानेच मला शिकवलं आहे. प्रतिक्रियेसाठी लिहिणं हा साहित्यनिर्मितीचा अपमान आहे असं मला वाटतं. वाचणाऱ्याची वाहवा ही काळजातून उत्स्फूर्तपणे आली तर ती खरी. वर 'ओळखीखातर प्रतिसाद दिला जातो' इ. मुद्द्यांचा उल्लेख आलेलाच आहे. झोळी फिरवून मिळवलेले प्रतिसाद किंवा 'जाऊ दे आपलीच बाळी / आपलाच बाब्या आहे देऊन टाकू प्रतिसाद' असे प्रतिसाद व्यक्तिशः त्या रचनाकाराच्या वाढीच्या दृष्टीने शून्य किंमतीचे असतात. अशा प्रकारच्या सामाजिक ऋण म्हणून दिल्या गेलेल्या प्रतिसादांवर काही अवलंबून नसतं हेही मला याच संकेतस्थळावर शिकायला मिळालेलं आहे. हे सर्व मुद्दे इथे मांडण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या कवितेचं विडंबन केलं म्हणून वाईट वाटून घेऊ नये किंवा विडंबकांनी काय, केंव्हा कधी , कसं करावं असा अनाहूत सल्ला देत बसू नये. त्याने फरक काहीच पडत नाही.
एके काळी 'ज्या दिवशी माझ्या कवितेचं विडंबन होईल त्या दिवशी माझ्या काव्यात दर्जात्मक आणि गुणात्मक वाढ झालेली असेल' अशी मला खात्री होती. त्या दिवसाची मी वाटही पाहत होते. पण सद्यपरिस्थितीमध्ये असला कुठलाही भाबडा आशावाद बाळगायची संधी मला मिळालेली नाही असं खेदानं म्हणावंसं वाटतं.
इथली चर्चा ही विडंबन केंव्हा करावे या विषयाशी संबंधित असल्यामुळे त्या बाबतीत तरी मी असं म्हणेन की कधीही का होईना, ते दर्जेदार असेल तर ते वाचून आनंद मिळेल. दर्जाहीन असेल तर काही बोलण्यात अर्थच नाही नाही का!
--अदिती