संजोपराव, अत्यंत सुंदर अनुभवकथन. शेवटी पैसे मिळाले की नाही? वेळ असल्यास आणि अजून खाते बंद केलेले नसल्यास एकदा बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाशी बोलावे असे माझे मत राहिल. गुंतवणुकीचा पीपीएफ हा खरंच एक उत्तम आणि सोयीस्कर मार्ग आहे. पीपीएफचे गुणगान करतेय म्हणजे मी एजंट वगैरे आहे असा गैरसमज करून घेऊ नका.. एजंटला कसे वठणीवर आणायचे ते मला विचारा.. :))

मी मात्र अशी सहजी सोडत नाही पिडणाऱ्यांना.. सरळ बँक मॅनेजरकडे जाऊन तक्रार नोंदवेन असं सांगते आणि गरजच पडल्यास तशी नोंदवतेही. त्यामुळे मी पहिल्यापहिल्यांदा कुठल्याही बँकेत काउंटरसमोर कमी आणि मॅनेजरच्या केबिनमध्येच जास्त असते ! एकदा काउंटरवरची पब्लिक ( किमान माझ्याबद्दलतरी ! ) सज्ञान झाली की मग पुढेपासून मॅनेजरला काही काम पडत नाही. सटास्सट कामे होतात.. मरणाची गर्दी असली तरीही !

माझे पीपीएफ खात्याला सुरू करून १६ वर्षे पूर्ण झाली होती, खाते बंद करण्याचा मनोदय नव्हता.. काही रक्कम काढून घेऊन ५ वर्षाची मुदतवाढ घ्यायची होती.
"
१५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा तुम्ही ५ वर्षाचा मुदतवाढीचा अर्ज दिलेला नाहीत त्यामुळे तुम्हाला असे अर्धवट पैसे काढता यायचे नाहीत" म्हणाला.
"
तुम्हाला द्यायचे नसतील पैसे तर तसं सांगा, खाते बंद करवून घ्यायचे असल्यास तसे स्पष्ट सांगा.. नसता तुम्ही जे म्हणताय ते मला लिखित स्वरूपात द्या, मी इथून ताबडतोब निघून जाईन.", असा दम दिल्यावर सरळ आला काहिसा.
"तुमचा खात्याची माहिती असलेले रजिस्टर सापडत नाही आहे, संगणकातली माहिती गृहित धरून पुढे जायचे म्हटल्यास तुमचा फोटो आमच्याकडे नाही ( आता यांना काय नऊ-दहा वर्षाच्या पोरीचा फोटो दिला होता का काय माझ्या बाबांनी कोण जाणे ! त्यावेळचा माझा फोटो मी कशी काय पैदा करणार आता?), तुम्ही मेजर झाल्याचा पुरावा आमच्या संगणकात नाही, ....... अशा कारणांमुळे पैसे भरण्याव्यतिरिक्त तुम्ही काहीही करायला आलात तर प्रश्न येणारच !"
"
जरूरीची कागदपत्रं संभाळायचे काम तुमचे आहे, जे नीट न करून वरतून आणखीन आम्हाला त्रास देता हे शोभत नाही तुम्हाला.", अशा शब्दात चांगली खरडपट्टी काढली मी त्याची.
"मॅडम, का उगाच माझी बिनपाण्याची करताय? काही कागदपत्रं मागत नाही पण खाते बंद करून घ्या.. संध्याकाळी चेक तुमच्या हातात देतो.. मग तर झालं?"
इत्तकं डोक्यात गेलेलं सगळंच प्रकरण की बस्स.. पण आणखी डोकं लावत बसायला वेळ नव्हता ( दुसऱ्या दिवशी नोकरी होती की नोकरीच्या गावी )..
"करा बंद खातं.. माझं तर कराच आणि मी आता फोन करून जमा करते त्या सर्वांचेही करा.", असे ओरडले मी.
"मॅडम, शांत व्हा जरा.. तुमचा चेक लागलीच देतो करून. मोठ्या साहेबांपर्यंत नकोय जायला हे प्रकरण मला.. प्लिज.."
एका तासाच्या आत भरभक्कम रकमेचा चेक घेऊन मी बाहेर आले होते ( जे मला अपेक्षित नव्हते. आता नवीन खाते म्हणजे परत सहा वर्षे पूर्ण करणे आले ! फाल्तू लेकाचे... ). माझ्यावेळीही रेव्हेन्यू स्टँपचा लोचा निघाला होता पण माझा राग पाहून त्याने परस्परच कसेतरी उपलब्ध करवले होते बहुतेक ! या गोष्टीला तब्बल २ वर्षे झालीत पण अजून काही मुहूर्त लागत नाहीये नवीन पीपीएफ खाते काढण्याचा.. आता काही वर्षांपासून इपीएफ उत्तमरीतीने चालू असल्याने माझ्या पीपीएफबद्दलचा उत्साह आणखीन कमी होतोय हेही आहेच. अर्थात मी म्हटल्याप्रमाणे त्या शाखेचे पीपीएफचे खासे उत्पन्न कमी करण्यात मी बरेचसे योगदान करूनच दम घेतला.. :-)