येथे चाललेली गरमागरम चर्चा सर्व दिग्गजांच्या अंमळ उशीराच नजरेत आलेली दिसते. असो. येथे या विषयावर माझे शेवटचे मत नोंदवतो आहे.

  1. विडंबन म्हणजे नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावा, चेष्टा नसावी. मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत. यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते.

  2. गझल तसेच कवितांमधील रूढ रूपके, विषय यांच्या वारंवारतेस आक्षेप म्हणून किंवा शहास प्रतिशह धोरणातून विडंबनातूनही तेचतेच विषय चघळणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की गझलेतील विकासाच्या विविध टप्प्यांवर रूपकयोजनांमधील वारंवारता बदलत गेलेली असली, तरी जी रूपके गझलेला तिच्या जन्मापासून अत्यंत प्रिय आहेत किंव जी कालौघात गझलेमध्ये रुळत गेली, त्यांना नव्या रूपकांच्या समावेशानंतरही कोणीही कधीही सोडलेले नाही. मराठी संस्कृतीत इतकी रूपके आहेत की कशाची वानवा नाही. पण निसर्ग, फुलेपाने, प्रियकर-प्रेयसी - त्यांचे प्रेम, विरह, चंद्रतारे, समुद्रकिनारे, सोयर्‍यांनी केलेले घाव, मित्रांनी दिलेला दगा यांना कधी कोणी सोडले नाही. मराठी गझलेस वाहून घेतलेल्या एका संकेतस्थळावरील गझल कार्यशाळेत आलेल्या अनेकोत्तम गझलांमधील रूपके, हाताळले गेलेले विषय यांची सांख्यिकी येथे पहा. हातोहात संगीता जोशींचे 'वेदना-संवेदना' हे पुस्तक लागले, नि त्यातल्या काही गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. यापुढची पायरी म्हणून 'एल्गार' मधील माझ्या आवडत्या निवडक १० गझला, अहमद फराज यांच्या येथील रॅन्डम १० गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. या सगळ्या केसेसमध्ये वापरलेल्या रूपकांची टक्केवारी लक्षात घेता, ती इतरत्र उपलब्ध निकालांशी फारशी फारकत घेते, असे दिसत नाही. अहमद फराज यांच्या 'खानबदोष चाहतें' आणि शहरयार यांच्या 'मेरे हिस्से की जमीन' या पुस्तकातील माझ्या आवडत्या निवडक १० गझलांमधील रूपकांची अशीच तपासणी करायचा आता विचार चालू आहे. निष्कर्ष फारसे वेगळे असतील, अशी अपेक्षा केलेली नाही; अनपेक्षित निकालांचा आश्चर्यमिश्रित आनंदच वाटेल.
    याच धर्तीवर मनोगत तसेच इतर संकेतस्थळांवरील 'प्रसिद्ध' विडंबनकारांच्या विडंबनांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी करण्याचा अनिवार मोह झाला होता. पण उद्या झोपेतून उठवूनही कोणी विचारले, तर त्यांच्या विडंबनात काय आहे, हे मी नक्की सांगू शकेन, अशी खात्री असल्याने तो मोह आवरला. यावरूनच तपासणीचे निष्कर्ष काय असतील, याची कल्पना यावी. अशा विडंबनांमधील 'प्रसिद्ध', वारंवार येणाऱ्या रूपकांव्यतिरिक्त नि विषयांव्यतिरिक्त नवे काहीसे (रूपके नि विषय) दाखवणारी अन्य विडंबने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतील.

  3. तिसरा मुद्दा प्रकर्षाने जाणवला, तो प्रतिसाद देण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा. विथ ऑल ड्यू रेस्पेक्ट टु ऑल दोज व्यूज, परखड प्रामाणिक मत नोंदवल्यावरही काही फरक पडत नसेल, तर याचा अर्थ नेटाने विरोध करणे सोडून द्यावे असा होतो का, याचा विचार करावा. दुर्लक्ष करणे किंवा काही न बोलता नुसते पाहणे/वाचणे म्हणजे मुखदुर्बळता, नि अरे ला कारे केले, तर तो हळवेपणा किंवा वेड असे सोईस्कर अर्थ काढून विडंबनाच्या प्रभावी माध्यमातून आचरटपणा करण्याचा परवाना मिळाल्यागत वागणाऱ्यांना जाहीर टोले हाणायला निदान मला तरी काही वाटत नाही. जोवर माझ्या मुद्द्यांविषयी मला पूर्ण खात्री आहे, तोवर मला ते जाहीरपणे मांडायला संकोच वाटत नाही. पण त्याचवेळी सध्या विडंबनांच्या माध्यमातून जो काही आचरटपणा सर्वांसमक्ष चालतो, त्याला प्रतिभा वगैरेचे लेबल चिकटवायचे की आणखी कसले याचा तसेच हा साहित्यिक दहशतवाद आणखी किती वेळ सहन करायचा नि त्यात किती उत्तम साहित्यकृतींचा नि साहित्यिकांचा बळी जाऊ द्यायचा याचा असे दोन्ही विचार येथील 'संवेददनशील', 'प्रतिभावंत' कवींनी तसेच रसिकांनी करावा, असे वाटते.

  4. आवड आपलीआपली या न्यायाचे किंवा झालेच तर लेखनस्वातंत्र्याचे निमित्त करून किंवा मेलेल्यास मारण्यात काय हशील म्हणून मूग गिळून बसण्याची भारतीय मध्यमवर्गीय मानसिकता निदान संकेतस्थळासारख्या आभासी माध्यमातून - निदान जे स्वतः संवेदनशील कवी, गझलकार, साहित्यिक धाटणीचे व प्रतिभेचे आहेत - त्यांना सोडता यावी आणि कोणतीही कविता, गझल, विडंबन व इतर साहित्यकृती 'डोळसपणे' आस्वाद घेण्यायोग्य व्हावी, या व्यापक हेतूसाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रामाणिकपणे वाटते. ब्लॉग्जवर अनिर्बंध लेखनस्वातंत्र्य उपभोगणे वेगळे नि सार्वजनिक संकेतस्थळावर जेथे तुमच्याबरोबरच इतर हजारो लेखक, वाचक वावरत असतात, तेथे ते उपभोगणे वेगळे. आधीच म्हटल्याप्रमाणे अशा मुक्त व्यासपीठावर लिहिताना जबाबदारी अधिक असते/असावी. ती स्वतः स्वत:साठी आखून घेतलेली आचारसंहिता असावी. नाहीतर 'लोकशाही'चे गळे काढून त्या नावाखाली वाटेल तो नंगानाच घालायला इतरही अनेक मराठी संकेतस्थळे आहेतच की! जेथे लोकशाही सर्वार्थाने रुजलीच नाही, अशा ठिकाणी लेखनस्वातंत्र्यादी बाता मारण्यात काय हशील?

असो. ही सारी वैयक्तिक मते झाली. पटण्या / न पटण्याबद्दल (किंवा पटवून घेण्या / न घेण्याबद्दल) न बोललेलेच बरे.

चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.