श्रीनि हयांनी अत्यंत चिकाटीने त्यांची बाजू लढवून धरली आहे, व त्याबद्दल त्यांची नक्कीच दाद दिली पाहिजे. परंतु 'शर्टात अंग घालणे' हे उदाहरण ह्या विषयात पूर्णपणे गैरलागू आहे असं मला वाटतं. ह्याबाबत vspindian (जाता जाता - हे काय बुवा नांव आहे?) ह्यांनी केलेला खुलासा (कर्ता वगैरे) १०० टक्के योग्य वाटतो. तरीही, श्रीनि हे गृहस्थ (बरोबर ना? म्हणजे ह्यापूर्वी लिंग गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करणारी काही पत्रंही इथे पाहिली आहेत, म्हणून विचारते/विचारतो), रोज सकाळी हँगर, खुंटी, अथवा दोरीवर लावलेल्या शर्टात, खाली वाकून व शर्टाला अजिबात हातही न लावता शिरायचा प्रयत्न करत आहेत, हे द्दष्य कल्पुन खुद्कन हसू आल्याशिवाय राहत नाही.
हा केवळ वाक् प्रयोग आहे, आणि सर्व भाषांमध्ये अशा प्रयोगांची लयलूट असते, वृकोदरानी काही उदाहरणे दिली आहेत. अशा प्रयोगांमुळे भाषा अधिक खुमासदार होतात, त्यांची गोडी वाढते, व शुद्धलेखनाशी वा व्याकरणाशी त्याचा काडीमात्रही संबंध नाही.
आपण सगळ्यांनी बोली ग्रामीण (गावरान) भाषा वापरुन केलेले चित्रपट पाहिले आहेत, तसंच हलक्या फुलक्या कथा-कादंबर्या (मिरासदार, शंकर पाटील इ.) आणि गंभीर साहित्य (माने, ढसाळ, जाधव इ.) ही वाचलं आहे. तसंच पेंडसे, खानोलकर, दळवी ह्या लेखकांनी वापरलेलं कोंकणी ही सहज आपल्या पचनी पडलं आहे.
माझ्यामते सगळ्यांना खटकतो तो 'धेडग़ुजरीपणा', विशेषतः लिखाणातला. जसं अनावश्यक इंग्रजी शब्द पेरलेलं बोली अथवा लेखी मराठी आपल्याला खटकतं, जसं जगातल्या सर्वश्रेष्ट, सार्वभौम सत्तेच्या नृपतिने 'न्युकिलर' (न्युक्लियर) म्हंटल्यावर आपल्या घश्यात मैद्याचं बेचव, कोरडं आणि कडक वेटोळं (प्रेट्झेल) अडकतं, जसा बासमती तांदूळाच्या मऊ भातात खडा लागतो, जसा मंद विस्तवावर शिजलेल्या झणझणीत मटणाच्या रश्श्यातला हाडाचा बारीक तुकडा दाढेत जीवघेणी कळ आणतो, तसाच 'बाना'तला 'न' साधारणपणे शुद्ध लिहिलेल्या मराठीत वाचकाला क्लेशकारक वाटतो. जर शंकर पाटलांचं एखादं पात्रं म्हणतं - 'काय राव म्या चाल्लो व्हतो न्हवं गुराला शोधंत, अन् एकसमयावच्छ्देकरोन (चूभू इत्यादि) म्होरं पाटील!', तसंच. ह्या संदर्भात महेश, वृकोदर आदिंनी मांडलेले विचार योग्य वाटतात.
वृकोदराला जर कोणी 'पानी' मागितलं, तर -
'नीट "पाणी" म्हंटल्याशिवाय थेंब पण मिळणार नाही शिंच्या',
असं उत्तर येईल असं मला तरी वाटत नाही.