पुलस्ती,
नमस्कार.
कविता,गझल आणि एकंदरच काव्यव्यवहार या सगळ्यांकडे गांभीर्याने पाहणारे एक जबाबदार कवी म्हणून मी तुमच्याकडे पाहतो...तुम्ही तसे आहात, ही बाब तुमच्या आजवर मी ज्या काही गझला वाचल्या, त्यावरून मला तीव्रतेने जाणवलेली आहे. असे जबाबदार कवी सध्याच्या काळात फार कमी आहेत. अशा पार्श्वभूमीवर तुम्ही माझ्यासाठी दिलाशाचे ठिकाण आहात. हे सारे मी का सांगत आहे ? कारण तुम्ही प्रमाद हा शब्द तुमच्या प्रतिसादात वापरलात म्हणून...!

पुलस्ती,
त्यात कसला आला आहे प्रमाद ? (या शब्दापुढे तुम्ही स्मायली टाकून त्याची तीव्रता कमी केलेली असली तरी...!) अहो, हसावे...हसावेसे... ही म्हटली तर चूक आहे, म्हटली तर नाही. त्याचे एवढे मनावर घेऊ नका. पण आपली गझल गोटीबंद, चिरेबंद असायला हवी, असे मला जसे वाटते, तसेच ते तुम्हालाही वाटत असणार, वाटायला हवे म्हणून सांगितले, एवढेच. आणि प्रत्येकच कवी अशा काही चुका करत करतच पुढे सरकत असतो...तेव्हा प्रमादबिमाद नका म्हणू. तुम्ही तसे म्हटल्याने मलाच खजील झाल्यासारखे वाटले. असो.
आता मार्गदर्शन ! याही शब्दाला मी फार फार घाबरतो, बिचकतो. तुम्ही-आम्ही सारेचजण कविता लिहिणारे आहोत. चुकत चुकत अचूकतेकडे जाण्याचा प्रयत्न करणारे आहोत. आणि एकाच रांगेत बसणारयांनी कसे करायचे एकमेकांना मार्गदर्शन ? तेव्हा हाही शब्द यापुढे नको !

तुमच्याकडून अधिकाधिक कसदार, दर्जेदार गझला लिहून होवोत, ही शुभेच्छा. धन्यवाद. अच्छा.