महेशराव,
नमस्कार
प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.
मी कवितेत विरामचिन्हे भरपूर वापरतो. ती यासाठीच की, मला जे म्हणायचे असते, ते जसेच्या तसेच पोहोचविता यावे. किमान माझ्या तशा प्रयत्नाला या विरामचिन्हांनी हातभार लावावा. विरामचिन्हांमुळे माझा हा प्रयत्न बऱयापैकी सफल होतो. थोडक्यात, मी कवितेत विरामचिन्हांचा वापर वाचकांचा वाटाड्या म्हणून करतो !!!
विरामचिन्हे वापरण्यामागे आणखीही एक कारण आहे व ते म्हणजे, वाचणाऱ्याला कविता सुलभतेने, सोपेपणाने, कुठेही लय न तुटता वाचता यावी. याही कवितेत, विरामचिन्हांच्या ठिकाणी थोडा विसावा घेऊन ओळी वाचल्यास सोपे जाईल.
काही ओळीत यतिभंग जरूर झालेला आहे. तेथे त्या ओळी कशा वाचाव्यात, ते पुढे सांगितले आहे.
ही कविता तीन गटांत वाचायची आहे.
म्हणजे असे -
रिमझिम तू । माझ्यावर । लवकर ये ।
हो माझी । श्रावणसर । लवकर ये ।
ती तशी वाचताना काही ओळींत यतिभंग झालेला तुम्हाला नक्कीच आढळेल. पहिल्या आणि तिसऱया कडव्यांत हे तीन गट व्यवस्थित पडतात.म्हणून, त्यांची उदाहरणे घेत नाही. ज्या कडव्यांत यतिभंग झालेला आहे, ती दोन कडवी अशी -
तूच फक्त; तूच निवारा माझा !
आणि
मिटले; सारे दरवाजे मिटले...
.........................
तूच फक्त; तूच निवारा माझा !
ही ओळ वाचताना तूच फक्त नंतर विसावा घ्यावा, विरामचिन्हानुसार. पुढे तूच निवा असे न वाचता तूच निवारा असे सलग एका दमात वाचावे...पुढे माझा हा शब्द आपोआप येईलच. (असे वाचल्याने यतिभंग झालेला असूनही, तसे वाटणार नाही !)
तूच विसावा नि सहारा माझा!
या ओळीत तूच विसा असे न वाचता तूच विसावा असे सलग वाचावे. थोडा विसावा घ्यावा. नि हा अगदी अलगद, ओझरता उच्चारावा आणि सहारा माझा हे दोन शब्द सलग वाचावेत.
ऐक जरा; ऐक पुकारा माझा !
या ओळीत ऐक जरा नंतर थोडा विसावा घ्यावा, विरामचिन्हानुसार. पुढे ऐक पुका असे न वाचता ऐक पुकारा असे सलग वाचावे...पुढे माझा हा शब्द आपोआप येईलच.
काहीही आता कर...लवकर ये !
या ओळीत तीन गट सहजपणे, यतिभंग न होता पडतात. त्यामुळे काहीच प्रश्न नाही.
..........
मिटले; सारे दरवाजे मिटले...
या ओळीत मिटले नंतर थोडा विसावा घ्यावा, विरामचिन्हानुसार. नंतर सारे दरवा असे न वाचता सारे दरवाजे असे सगल एका दमात वाचावे....विसावा घ्यावा. पुढे मिटले हा शब्द आपोआप येईलच.
फिटले रे; जाल भ्रमांचे फिटले...
या ओळीत फिटले रे; असे वाचावे, विरामचिन्हानुसार. त्यापुढे जाल भ्रमां असे न वाचता जाल भ्रमांचे असे सलग एका दमात वाचावे...विसावा घ्यावा. पुढे फिटले शब्द आपोआप येईलच.
मन आता या जगण्याला विटले...
या ओळीत मन आता असे वाचल्यावर पुढे या जगण्या असे न वाचता या जगण्याला असे सलग एका दमात वाचावे...विसावा घ्यावा. पुढे विटले हा शब्द आपोआप येईलच.
ये मरणा, ये लवकर ! लवकर ये !
या ओळीत तीन गट सहजपणे, यतिभंग न होता पडतात. त्यामुळे काहीच प्रश्न नाही.
........................
महेशराव,
कविता, गाणे किंवा गझल वृत्तात लिहिताना मी गालगागा गागागा लगागागा गलागा...असल्या कुठल्याच भानगडीत पडत नाही. ही भानगड अगदी अलीकडच्या काही वर्षांदरम्यान मुंबईच्या दिशेकडून निघाली आणि त्याच परिसरातील (आणि अलीकडे इतरत्रही) काही अतिउत्साही झटपटकवींच्या, झटपटगझलकारांच्या मानगुटीवर जाऊन बसली !!! आणि मग साहजिकच ते या गालगागा वगैरेशीच झटापट करत राहिले......! ही झटापट पाहून काव्य बिचारे घाबरून चिडीचूप झाले आणि या गलागाचाच इतका गलका झाला की काही विचारू नका...!
पूर्वी कविता वृत्तात, छंदात लिहायची, तर त्या काळच्या जाणकारांनी वृत्तांबाबत शास्त्रीय विचार करून काही नियम, संकेत ठरवले होते...उदाहरणार्थ ः राधिका राधिका यमाचा गा... अशी असंख्य उदाहरणे देता येतील; पण वानगीदाखल एवढे एकच पुरेसे आहे. मी काही त्या जुन्या काळातला मनुष्य नाही; पण त्या काळच्या जाणकारांनी जी आपल्यासाठी तयार करून ठेवलेली आहे, तीच पद्धती वृत्तबद्ध कविता, गझला लिहिताना मी वापरतो.
........................
माननीय चित्त यांनीही या यतिभंगाबाबत खुलासा केलेला आहेच; त्यांच्याशी मी सहमत आहे. चित्त यांना मनापासून धन्यवाद.
........................
सरतेशेवटी, पुन्हा एकदा मनापासून आभार, महेशराव. लोभ असू द्यावा, ही विनंती.
आपला,
प्रदीप कुलकर्णी