अनिरुद्ध,
गझल फारच अप्रतिम आहे. एकेक कल्पना खणखणीत आणि सादरीकरणही सहज. प्रासादिकता किंवा लहजा म्हणतात, ते हेच असावे, असे वाटले. छान.
'अद्यापही सुर्याला माझा सराव नाही' चे वृत्त दिसते.
गळफासमुक्तीचा शेर अतिशय प्रासंगिक आणि तो धरून शेवटचे शेर फार मार्मिक आहेत.
इतक्या चांगल्या गझलेस तीट लावावीशी वाटली म्हणून काही तांत्रिक उणिवा दाखवून देण्याचे धाडस करतो आहे, पटल्यास पहा. माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण गझलेत एकच काफिया किती वेळा चालवावा, याला मर्यादा असते. यात 'शेत' व्यतिरिक्त 'येत' आणि 'नेत' सोडून फार काही दिसत नाही. इतक्या छान कल्पना डोक्यात असताना, चपखल शब्दयोजनेची देणगी लाभली असताना काफियांच्या बाबतीत मारवाडीपणा का बरे? समृद्ध काफिया संच असेल, तर कल्पनावैविध्य आणि त्यायोगे पूर्ण गझलही समृद्ध होते, असा स्वानुभव आहे. चूभूद्याघ्या. <कोणीतरी> येत नाही, <कुठेतरी/कोणालातरी> नेत नाही यांची पुनरावृत्ती त्यातून टाळता आली असती. 'बेत', 'प्रेत', 'मजेत', 'घेत', 'कवेत' इ. काफिये योजता आले असते. आठवा दादांची गझल -
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते
असो. जे काही थोडेफार लिहिलेवाचले आहे, अनुभवले आहे, त्यावरून हे सांगावेसे वाटले. तज्ज्ञ असल्याचा दावा करीत नाही; सबब, पटल्यास पहा अन्यथा सोडून द्या.
'काळीज धडकल्याचा' गुणगुणण्यात अंमळ अडखळायला होते आहे. त्यापेक्षा सोपे काही योजता आले तर पहा. मला 'हृदयात स्पंदनांचा' असे सुचले. हृदयात स्पंदनांचा आवाज होत नाही.
पुढील उत्तम रचनांसाठी अनेक शुभेच्छा.