महेशराव,
नमस्कार.
अरे, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय...सर्वप्रथम क्षमा!

तुम्ही आव्हान देण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी लिहिलेले नाही, हे मला कळले.मी तसे कसे समजेन बरे ? मी तसे चुकूनही म्हणणार नाही, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत असावे.

तुमच्या प्रतिसादात गालगागा वगैरेचा उल्लेख आला आणि मला राहवले नाही आणि आपोआपच माझी ती (काहीशी प्रखर ?) प्रतिक्रिया उमटून गेली. असो.

मात्रावृत्तात अक्षरगणवृत्तासारखे गट पाडता येणार नाहीत, हे खरे. पण मात्रावृत्तात लयीनुसार, नादानुसार शब्दसमूहाचे गट पाडता येतील...उदाहरणासाठी  मात्रावृत्तातील गझल घेऊ या.(उदाहरणासाठी माझ्याच कवितांचा, गझलांचा आधार मी घेत आहे...कारण मला निःसंकोचपणे चिरफाड करता यावी !!!)

वाजवीत ये, छुन् छुन् पैंजण, एकदाच ये !
आसुसलेले, माझे अंगण,    एकदाच ये !


पुन्हा करू त्या, सुख-दुःखांच्या, हळव्या गोष्टी...
पुन्हा जगू ते,  गेलेले क्षण,    एकदाच ये !


एकदाच ये, एकदाच ये, म्हणू कितीदा ?
तुला कितीदा, हवे निमंत्रण, एकदाच ये !


आता ही अक्षरगणवृत्तातील गझल नसूनही तिचे व्यवस्थित गट पाडता आले. प्रत्येक ओळीत स्वल्पविरामाने हे गट दाखविले आहेत.
प्रत्येक गटातील मात्रांची संख्या एकसारखी (शिवाय प्रत्येक ओळीतील मात्रांचीही संख्या साहजिकच एकसारखी).
अक्षरगणवृत्तात कविता किंवा गझल लिहिताना गालगागाची मदत घ्यायची वेळ माझ्यावर सुदैवाने आली नाही. मात्रावृत्तात रचना लिहितानाही असेच झाले.

एखादी ओळच अशी काही सुचते की, पुढे ती रचना अक्षरगणवृत्तात होणार की मात्रावृत्तात, हे तिथेच समजून जाते.
उदाहरणार्थ घेऊ या पुन्हा माझ्या काही जुन्या ओळींचे ...

१) बोलूनही तु्झ्याशी मन मोकळे न झाले...ही ओळ मला सुचली. लक्षात आले की, ही कविता / गझल / गाणे अक्षरगणवृत्तात होणार...मग पुढची ओळ सुचली - सांगायचे मला जे, ते सांगता न आले.

बोलूनही तु्झ्याशी मन मोकळे न झाले !
सांगायचे मला जे, ते सांगता न आले !

(या द्विपदीतील प्रत्येक ओळीचे दोन गट पडतात...बोलूनही तुझ्याशी  हा गट पहिल्या ओळीत आणि सांगायचे मला जे हा गट खालच्या ओळीत.मन मोकळे न झाले उत्तरार्धातील गट पहिल्या ओळीत आणि ते सांगता न आले हा उत्तरार्धातील दुसरा गट दुसऱया ओळीत.)

२)कधी लागतो ठसका; उचकी कधा कधी...ही ओळ मला सुचली. लक्षात आले की,ही कविता / गझल / गाणे मात्रावृत्तात होणार...(मग पुढची ओळ सुचली - तुझी आठवण येते इतकी कधी कधी

कधी लागतो ठसका; उचकी कधा कधी !
तुझी आठवण येते इतकी कधी कधी !

(या द्विपदीतील प्रत्येक ओळीचे दोन गट पडतात...कधी लागतो ठसका हा गट पहिल्या ओळीत आणि तुझी आठवण येते हा गट  खालच्या ओळीत.उचकी कधी कधी हा गट उत्तरार्धातील पहिल्या ओळीत आणि इतकी कधी कधी हा दुसरा गट दुसऱया ओळीत.)

रचना अक्षरगणवृत्तात होणार की मात्रावृत्तात हे पहिल्या ओळीतच कसे समजते, असे विचाराल तर, लघु-गुरू अक्षरांचा क्रम घेऊन कोणता शब्द कशा पद्धतीने त्या ओळीत आला आहे, त्यावरून हे माझ्या लक्षात येते. (अन्य कविवर्यांची लक्षात येण्याची रीत वेगळीही असू शकेल.). त्यासंदर्भात कविता / गझल /गाणे लिहिताना पहिली ओळ सुचण्यावर बरेच काही असते...ही जी पहिली ओळ असते, ती बाळाचे पाय पाळण्यात दाखविणारी असते !!!

...पण मात्रावृत्तात लिहिताना संबंधित रचनेतील प्रत्येक ओळीचे असेच गट पडतील असे नाही. यतिभंगाचा धोका इथे जास्त असतो. (माझ्या अगदी गेल्यावेळच्या कवितेप्रमाणे). अक्षरगणवृत्तात हा धोका कमीत कमी असतो. 

................

....लघ्वक्षरांचे अढळपद सांभाळले की झाले, अशी माझी समजूत आहे, तुमची ही ओळ मला समजली नाही. कृपया अधिक स्पष्ट केल्यास बरे होईल.

आपला,
प्रदीप कुलकर्णी