भारतात सुमारे दोन हजार भाषा बोलल्या जातात, अमेरिकेत पाच हजार तरी असतील. शिक्षण फक्त इंग्रजी आणि कदाचित काही युरोपियन भाषांतून मिळत असेल. मराठीतून नक्की मिळत नाही, तुमच्या पाल्याची मातृभाषा मराठी असली तरी! जर्मनीत सुमारे १५० भाषा बोलल्या जातात, शिक्षण फक्त जर्मन आणि फ्रेंचमधून..इंग्रजीतूनसुद्धा नाही. हे यापूर्वी मी मनोगतावर पुरावे देऊन सिद्ध केले होते, ते अनेकांना पटले होते, पण आता फार जुने झाल्यामुळे सापडणार नाही. (एकदा सापडले होते, पण त्यातले काही प्रतिसाद गायब झाले होते!)
इंग्रजांच्या काळात पुण्यातल्या आमच्या शाळेत चार भाषा सक्तीने शिकवीत. इंग्रजी, मराठी, तिसरीपर्यंत हिदुस्थानी(हिन्दी नाही!), पाचवीपर्यंत संस्कृत आणि पुढे सातवी(मॅट्रिक) पर्यंत संस्कृत ऐवजी ऐच्छिक जर्मन किंवा फ्रेंच. काही शाळांत अरेबिकची सोय होती. हे सर्व स्वातंत्र्यानंतर बंद झाले. जगात इतरत्र ते चालू आहे. भारतात पाच भाषा शिकवायला काही हरकत नाही. दाक्षिणात्यांना हिंदी शिकण्याची सक्ती करताना उत्तरी भारतीयांना एक द्राविड भाषा शिकवावी अशी योजना होती. उत्तरेचे काहीच ऐकत नसल्याने ती बारगळली. महाराष्ट्रात संपूर्ण पिढी घालवली तरी यूपी-बिहारी मराठी बोलू शकत नाहीत. दाक्षिणात्य बोलतात. महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेकानेक दाक्षिणात्यांना चाराहून अधिक भाषा येतात.