सर्वांनाच बरे वाईट अनुभव येत असतात.

सर्वसाधारणतः नामांकित संस्थेत माणूस स्वस्त पर्याय डावलून का जातो? तर काही रास्त अपेक्षा मनात धरुन:

१)फसवणुक टाळून पारदर्शक व्यवहार व मोजलेल्या (थोड्या जास्तच) पैशांचा चोख मोबदला मिळावा

२) जिथे आपण एकदाच जाणार असतो तिथे गेल्यावर पाहण्यासारखे आहे ते सर्व पाहायला मिळावे, त्यात काटछाट असू नये

३) उत्तम व्यवस्थापन व देखरेख - ज्यायोगे आपल्याला अक्षरशः काहीही धावपळ करायला लागू नये वा खटपट करायला लागू नये

४) सुनियोजित सहलीमुळे अधिकाधीक स्थलदर्शन व्हावे. आपण परगावी/ परदेशी जातो तेव्हा खोलीवर लोळत वेळ घालवण्यापेक्षा जास्तीत जास्त पाहण्यासारखे ते पाहता यावे म्हणून

५) रिकाम्या पोटी निसर्गाचे, सौंदर्याचे, आधुनिकतेचे, निर्मितीचे किंबहुना कशाचेच कौतुक फार काळ जमत नाही, तेव्हा प्रवासात जेवण खाणाची आबाळ होऊ नये.

६) अनोळखी प्रदेशात गेल्यावर राहायचे ठिकाण सुरक्षित, सोयींनी युक्त (भले अलिशान नसो), स्वच्छ व सोज्वळ असावे (विश्वास ठेवा अगर ठेवू नका अनेकदा ४/५ तारांकित हॉटेलात सुद्धा रात्री आंतर्ध्वनीवर 'सहवास' वा 'सेवा' हवी आहे का अशी विचारणा होते)

मात्र निर्दिष्टित किंमत आगाऊ भरुनही जेव्हा असे अनुभव येतात तेव्हा उद्विग्नता येणे स्वाभाविक आहे. या संस्थेविषयी माझे मत अगदी अलिकडेपर्यंत बरे होते. मात्र डिसेंबर ०६ च्या राजस्थान सहलीनंतर ते मावळू लागले होते व आता आपण जे लिहिले आहेत ते वाचता बरेच गढुळले आहे. कदाचित "नाव लौकिक मिळाला, व्यवसाय भरभराटीला आला आता आम्हाला काही पडली नाही, आमच्या सहली भरभरून जात आहेत, पाहिजे तर या नाहीतर नका येऊ" अशी वृत्ती दुर्दैवाने आली असण्याची शक्यत नाकारता येत नाही. मात्र एका मराठी व्यावसायिकाने सर्व मराठी माणसांनी अभिमान बाळगावा असे स्थान पर्यटन क्षेत्रात मिळविले असताना आता ते असे घालवावे याचे वाईट वाटले.

यापूर्वीचा (शेवटची सहल वगळता) माझा अनुभव चांगला होता. सात वर्षांपूर्वी माझे आई-वडील याच संस्थेबरोबर मेवाड सहलीला गेले असताना पहिल्या मुक्कामी पोचताच वडीलांना अचानक प्रोस्टेट चा त्रास उद्भवला. आरोग्याची कधीही कसलीही तक्रार नसलेल्या व सत्तरी उलटून गेल्यावरही तरुणांना लाजवेल असा उत्साह व उरक असलेल्या वडीलांना अचानक झालेल्या त्रासाने आई फार घाबरली. आम्हाला दुसऱ्या दिवशी उजाडताच हे दूरधव्नीद्वारे समजले. सर्वात जवळचा विमानतळ जोधपूरचा होता आणि तिथे त्याकाळी फक्त इंडियन एअरलाईन्सचे सकाळी एकच उड्डाण होते व ते मिळणे शक्यच नव्हते. मी तातडीने मुख्यालयाशी संपर्क साधला व थेट संस्थेच्या मालकिणबाइंशी बोललो. मात्र त्यांनी 'तुमचे आई वडील आमच्या कडे आमच्या जबाबदारीवर अगदी सुखरूप आहेत; आमच्या कडे पैसे, माणसे व यंत्रणा असे सर्वकाही आहे तेव्हा तुम्ही अजिबात जायला निघू नका, निर्धास्त रहा" असे सांगितले व त्याप्रमाणे सहलीचा प्रभारी, कर्मचारी व सहप्रवासी यांनी अतिशय उत्तम काळजी घेत माझ्या आई-वडीलांना व्यवस्थित सांभाळले व मुंबईपर्यंत आणले व तेही संपूर्ण सहल पुरी करून!

गेल्या सहलीत मला ढासळलेला जेवणखाणाचा दर्जा, घाइ करण्याची/ उरकण्याची प्रवृती व अपुरे नियोजन व जमल्यास प्रवाशांना थातुर मातुर हॉटेलात उतरवण्याचा प्रयत्न या गोष्टी खटकल्या.  सगळ्यांनाच एका ठिकाणचे हॉटेल खटकले तरीही 'कुणीतरी बोलेल, आपण का तोंड वाजवा' अशी प्रवृत्ती जाणवली. मात्र सामान खोल्यांमध्ये ठेवून सगळे जेवायला भोजन दालनात आलो तेव्हा सर्वांनाच हॉटेल नापसंत असल्याचे समजले. मी पुढाकार घेतला व इथे राहणार नाही असे ठणकावून सांगीतले. एक आवाज उठताच अनेक जण पाठीशी उभे राहीले. सहल प्रमुखाला सामंजस्याने सांगीतले की हे हॉटेल राहण्याच्या लायकीचे नाहे आणि ते तुम्हालाही दिसत आहे. "कदाचिते ते तुम्हालाही माहित असेल पण तुम्ही हुकुमाचे ताबेदार असल्याने तुम्हाला काही बोलणे शक्य नसेल. मला तुमच्या विषयी तक्रार नाही, पण तुम्ही तातडीने मुख्यालयाशी बोला आणि हॉतेल बदलून घ्या" असे म्हणताच आपल्या पगाराशी इमान राखून त्यांनी 'असे अचानक इतक्या लोकांना कुठे नेणार? मोसम चालू आहे, सर्व हॉटेल भरली आहेत' वगैरे सांगाचा प्रयत्न केला. मी व माझ्या मागे उभ्या राहिलेल्या लोकांनी ठामपणे नकार दिला. मी त्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा, तोपर्यंत पर्यायी व्यवस्था पाहायला आम्ही मदत करू. खरोखरच आम्ही ३० मिनिटात जवळच असलेल्या चांगल्या हॉटेलात बोलून २५ खोल्या उपलब्ध करून तसा प्रस्ताव घेउन आलो. सगळे अवाक झाले. समजा याच हॉटेलशी तुमचा करार असेल व दुसऱ्या हॉटेलला रोख द्यायला पैसे नसतील तर आत्ता आम्ही खर्च करू, तो परत गेल्यावर भरून देण्याचे तुम्ही मुख्यालयाकडून लेखी मागवा असे सांगताच त्याना कोणताही पर्याय उरला नाही. अखेर दोन तासानी आम्हाला एका चांगल्या हॉटेलात नेण्यात आले. जाऊन स्थावर होईस्तोवर संध्याकाळ झाली. महिलावर्ग खरेदीला गेला. परतयला उशीर झाला व नियोजीत स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रद्द झाला. स्थलदर्शनात यावेळी भराभर उरकण्याकडे कल दिसला.

बहुधा संस्था आता नामांकित झाली आहे, त्यांचे लक्ष परदेश सहलींवर असावे व त्यामुळे भारतातील सहलीकडे थोडे दुर्लक्ष होत असावे असे वाटले होते. मात्र आपले लेखन वाचून तिथेही आनंदच आहे हे समजले व गेल्या वर्षी आमचे जाणे बारगळले ते बरेच झाले असे वाटले.

मात्र  २००१ साली मलेशियन एअर ची खास योजना असताना आम्ही आपले आपण मलेशिया सिंगापूर भटकून आलो तो अनुभव फारच अप्रतिम होता, सगळी आरक्षणे इथून पर्यटन व्यवसायात असलेल्या मित्राद्वारे करून घेतली होती. अवघ्या ९० हजारात आम्ही दोघे व चिरंजीव १० दिवस फिरून आलो. कसलीही काटकसर न करता. के एल मध्ये आम्ही पेट्रोनास मनोऱ्यांच्या बरोबर समोर असलेल्या पार्क रॉयल मध्ये चार दिवस तर २ दिवस भल्यामोठ्या लिजंड मध्ये ३२ व्या मजल्यावर राहिलो होतो. टॅक्सी चालकाशी संधान बाधून मनसोक्त स्थलदर्शन केले, त्याचे टॅक्सीवाल्याने आवर्जून आम्हाला उत्तम अशा 'बाँबे पॅलेस' मध्ये जेवायला जाण्याची शिफारस करीत नेऊन सोडले व तिथे मालक दयाळ साहेबांनी आमचे आगत्य केले व सुंदर भोजन दिले, परदेशात भारतीय भोजन महाग असते तरीही झालेल्या खर्चाचे काही वाटले नाही. सिंगापूरात लितल ईंडियात न्यू पार्क सेंट्रात चार दिवस होतो, सर्वत्र फिरायला टोयोटा/ मर्सिडिज वॅगन होत्या. कुठेही जायची वा परत निघायचे घाई केली गेली नाही. शिवाय आपले आपण असल्याने बोट, मेट्रो, टॅक्सी असे सर्व भ्रमण केले, रस्त्यावर मनसोक्त भटकलो.

सहल संस्थांविषयी काही निरिक्षणे

१) बरीच माहिती लपवली जाते

२) ग्राहकाला पैसे जमा करायला नाना प्रयुक्त्यांनी भाग पाडले जाते व भरलेले पैसे परत मिळत नाहीत, स्थिती व शर्ती बदलल्या तरी प्रवासाला जावेच लागते

३) कुठली विमानसेवा हे पटकन; किंबहुना पैसे भराय्च्या आधी सांगितले जात नाही. पैसे वाचवायला अनेकदा फालतू वा गैरसोयीच्या वेळी उड्डाण असलेल्या विमानसेवा घेतल्या जातात.

४) एकेकाळी चांगली असलेली पण आता चालत नसलेली हॉटेल्स घेतली जातात, या लेखात नमूद केल्याप्रमाणे खोल्यांमधल्या अनेक सुविधा काढून घेतलेल्या असतात. कारण सहल संस्थेला अतिरिक्त खर्चाची जबबदारी घ्यायची नसते व हॉटेल व्यवस्थापन प्रवाशांकडून परस्पर पैसे घेण्याच्या बोलीवर मद्यसंग्रहा सारख्या (बार) सुविधा देण्यास तयार नसते (फुकट प्रत्येक खोलिवर फौजदारी कोण करणार?)

५) आलेल्या प्रवाशांची एकेमेकाशी ओळख नसते, लोक भिडस्त असतात व सगळे एकत्र येउन आपल्याला जाब विचारणे फार दुरापास्त असल्याचे अचूक ओळखून गुंडाळले जाते

असो. ग्राहक राजा जागा रहा. किमान असे अनुभव आल्यवर गप्प बसू नका. अजुनही वेळ गेलेली नाही, थेट मुख्यालयाशी संपर्क साधा, माल्किण बाइंशी बोला. "आम्हाला रक्कम परतीची अपेक्षा नाही पण तुम्ही लोकाना काय सेवा देता हे तुम्हाला माहित नसल्यास ते समजावे म्हणून ही तक्रार आहे' असे स्पष्ट सांगा. प्रतिसाद नक्किच मिळेल.

आपला अनुभव देउन सर्व वाचकांना परिस्थिची जाणीव करून दिल्याबद्दल व जागरुक केल्याबद्दल व इतका वाइट अनुभव येउनही अतिशय संयत असे लिहिल्या बद्दल आपले आअभिनंदन व आभार.