प्रदीप कुलकर्णी, छाया राजे, विनायकजींनी माझ्या गजलेच्या निमित्ताने जी चर्चा केली आहे त्यात खरोखरच अनेक चांगले मुद्दे मांडले गेले आहेत. अशा चर्चा म्हणजे वाद नव्हेत, अशा चर्चांमुळेच गजल (किंदा कोणताही वाडमयप्रकार) समृद्ध होत जाते (जातो).
'अजब' हे तखल्लुस मला स्वतःला अर्थपूर्ण वाटलं, आवडलं आणि छायाताईंनी म्हटल्याप्रमाणे विशेषण म्हणूनही वापरता आलं म्हणून ज्या ज्या गजलेत अशी संधी मिळाली तिथे मक्ता लिहिला. अर्थात माझ्या सगळ्या गजलांमध्ये मक्ता लिहिलेला नाहीये. तखल्लुसचा असा वापर एक गंमत म्हणून स्वीकारला जावा असं वाटतं.
मुळात मक्ता असावा का याबद्दल... मला स्वतःला मक्ता वाचायला आवडतो कारण त्यात गजलकाराची छाप दिसते, शेवटचा शेर असल्याचा संकेत मिळतो आणि गजलकाराची या टोपणनाव घेण्यामागे काय भूमिका असेल याबद्दलचं कुतूहलही वाढतं. मक्त्याला कालबाह्य ठरवू नये कारण आजही मक्ता आवडणारे माझ्यासारखे (विनायकजींसारखे) लोक असतीलच. राहिला मुद्दा आवश्यकतेचा. मा. सुरेश भटांच्या मते आधुनिक काळात मक्त्याची गरज नाही कारण शायराचे नाव गजलेत नसेल तरी लोकांना कळतेच आणि 'तखल्लुस' एखाद्या आवश्यक शब्दाची जागा अडवतो. मला वाटतं की जसं आजच्या गजलकारांनी उर्दू गजलकारांचं अंधानुकरण करू नये तसंच सुरेश भटांच्या या मताचंही अंधानुकरण करू नये. आपल्याला जे आवडतं ते करावं; रसिकांना जे आवडतं ते रसिक निवडतीलंच! ... आणि जोपर्यंत हे लोकांना आवडतंय तोपर्यंत त्याला कालबाह्य का ठरवावं?
'अजब' आपली सवयच बदलत नाही
बदलू नाही शकलो दोघेही जण... या शेराबद्दल- गजलमध्ये गूढता राहावी आणि ती संवादात्मक व्हावी यासाठी काहीवेळा 'दुसरी' व्यक्ती अध्याहृत धरली जाते. अर्थात इथे जरी आपण दोघे म्हणजे मी आणि प्रेयसी असे अभिप्रेत असले तरी विनायकजींनी म्हटल्याप्रमाणे अनेकदा परमेश्वराशी वा स्वतःशी निर्देश स्पष्ट उल्लेख न करता गजलेत केला जातो.
पण मला प्रदीपजींचा हा मुद्दा जरूर पटतो की 'समजून' वाचलं तर सारं कळतं.... मलाही गजलेतला किंवा कवितेतला 'अर्थ' समजावलेला आवडत नाही. मुळातच कवितेत अर्थाअपेक्षा 'परिणाम' महत्त्वाचा असं माझं मत आहे...
आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.
अजब.