तखल्लुससंदर्भातील प्रतिसादावर बरीच चर्चा झडली. त्या चर्चेचे स्वागत. पण हे सर्व वाचल्यानंतर जाणवलं ते इतकंच की - क्या बने बात जहाँ बात बनाये न बने !!! त्यामुळे अजब यांची भूमिका मी समजून घेतली आहे. तरीही सर्वच गझलकारांच्या, गझलरसिकांच्या विचारार्थ यानिमित्ताने काही मुद्दे ठेवावेसे वाटले, म्हणून ठेवत आहे. (हे लिहिण्यामागे कोणताही अभिनिवेश नाही, हे कृपया सर्वांनीच ध्यानी घ्यावे.)
१) कोणतीही गोष्ट रुजू लागली की तिची मुळे कमकुवत करणाऱ्या प्रवृत्ती सदासर्वकाळ सर्वत्र आढळतात. मराठी गझल (चुकलो, ग़ज़ल!) आता चांगलीच रुजली आहे; तरीही हा काळ तिच्या फुलण्या-बहरण्याच्या दृष्टीने खूपच नाजूक आहे. तिच्या मुळांना याच काळात सर्वाधिक जपले पाहिजे. तिची वाट आता कुठे प्रशस्त बनू पाहत आहे. या वाटेला कोणतेही अनावश्यक फाटे फुटू न देता ही वाट अधिकाधिक विस्तृत करणे, हे सर्वच गझलकारांचे परमकर्तव्य होय. अजब यांच्या गझलेला प्रतिसाद देताना हा विचार मनात होता. त्या विचारातूनच जे लिहावेसे वाटले होते, ते मी येथे लिहिले. माझ्या म्हणण्याचा पटल्यास विचार करावा; नाही पटले तर विसरून जायला आपण मोकळे आहातच, अशी माझी अनाग्रही भूमिका त्याच वेळी नमूद केली होती.
२) एक गझलकार या नात्याने गेल्या पाच-सहा वर्षांत मला जे जाणवले, ते आता मांडत आहे...
गझल हा शब्द रूढ असताना, रुळला असताना विनाकारणच ग़ज़ल हा शब्द रूढ करण्याचा, रुळविण्याचा प्रयत्न करणे, तखल्लुसची आवश्यकता नसताना केवळ छाप राहावी म्हणून तो वापरणे (आपली संपूर्ण गझल हीच एक छाप आहे, असे तखल्लुस वापरणाऱ्यांना का बरे वाटत नाही ?) असे काही प्रकार आढळून येतात. गझलेच्या मुख्य प्रवाहातून असे ओहोळ बाहेर फुटताना दिसतात. तखल्लुसविषयीची चर्चा सुरू करताना याही बाबी मनात होत्या.(आता, तखल्लुस वापरणारे अजब हे एकटेच गझलकार आहेत, असे नाही. त्यामुळे माझा अर्थातच त्यांच्या एकट्यावर अजिबातच रोख नाही. त्यांची ही गझल या चर्चेसाठी केवळ निमित्तमात्र ठरली !)
3) तखल्लुसचा असा वापर एक गंमत म्हणून स्वीकारला जावा, असे अजब यांनी म्हटले आहे. यावर काय बरे बोलायचे ? गझललेखनाकडे कमालीच्या गांभीर्याने बघणाऱ्या माझ्यासारख्याला ही गंमत अजबच वाटली !!!
४) अजब यांनी म्हटले आहे की - मा. सुरेश भटांच्या मते आधुनिक काळात मक्त्याची गरज नाही कारण शायराचे नाव गजलेत नसेल तरी लोकांना कळतेच आणि 'तखल्लुस' एखाद्या आवश्यक शब्दाची जागा अडवतो. मला वाटतं की जसं आजच्या गजलकारांनी उर्दू गजलकारांचं अंधानुकरण करू नये तसंच सुरेश भटांच्या या मताचंही अंधानुकरण करू नये.
- तखल्लुसविषयी कविवर्य सुरेश भट यांनी मांडलेल्या मताचा उल्लेख अजब यांनी केला, ते बरेच झाले. एखादा कवी, साहित्यिक एखाद्या विशिष्ट साहित्यप्रकारासाठीच आपले सारे आयुष्य वेचतो, तेव्हा त्याच्या त्या तपस्येमधून, त्या साहित्यप्रकाराच्या चिंतनातून, मंथनातून काहीतरी सार निघत असते. हे सार पुढील पिढीपुढे विचारार्थ ठेवणे, हे मागील पिढीचे कर्तव्यच असते. त्या कर्तव्यभावनेतूनच तखल्लुसबाबतचेही मत कविवर्य सुरेश भट यांनी मांडलेले आहे. मराठी गझलेच्या क्षेत्रातील अंतिम शब्द असलेले कविवर्य सुरेश भट यांचे हे मत ज्यांना पटेल, ते ते स्वीकारतील (आणि तखल्लुस वापरणार नाहीत) आणि ज्यांना पटणार नाही, ते ते स्वीकारणार नाहीत(आणि ते तखल्लुस वापरतील). आता ज्या गझलकारांना हे मत पटेल, त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या या मताचे अंधानुकरण केले, असे अजिबातच होत नाही. तसेच ज्यांना हे मत पटणार नाही, त्यांनीही फार काही स्वतंत्र विचार करून तखल्लुस वापरणे सुरू ठेवले आहे, असेही नाही. (उर्दूतील तखल्लुस वापरण्याच्या परंपरेचीच री ते ओढत आहेत. त्यात त्यांचा असा कोणताही स्वतंत्र विचार नाही. शेवटी अंधानुकरणच, हे किंवा ते !!!). शिवाय, काही काही ठिकाणे ही अनुकरण, अंधानुकरण याहीपलीकडची असतात. त्या प्रांताचे नाव असते श्रद्धा !!!
५)अजब यांनी म्हटले आहे - आपल्याला जे आवडतं ते करावं; रसिकांना जे आवडतं ते रसिक निवडतीलंच! ... आणि जोपर्यंत हे लोकांना आवडतंय तोपर्यंत त्याला कालबाह्य का ठरवावं?
- अलबत्. आपल्याला जे आवडतं ते आपण जरूर करावं. अगदी सहमत. मी वर म्हणूनच तर म्हटले आहे की,पटल्यास विचार करावा. नाही पटले तर विसरून जायला आपण मोकळे आहातच.
रसिकांनाही जे आवडतं, ते रसिक निव़डतीलच... ! अजब यांच्या याही मताशी मी सहमत आहे!!! पण रसिक या शब्दाची नेमकी अशी व्याख्या नसल्यामुळे याबाबत काय बोलणार ? ही व्याख्या प्रसंगी खूपच व्यापकही होऊ शकते आणि प्रसंगी खूप संकुचितही !!! आणि कोणत्या (व्यापक की संकुचित) रसिकसमूहाला कधी काय आवडेल, हे कुणीच सांगू शकणार नाही. रसिक ही अशी चंचल चीज आहे की, त्याला एकाच वेळी हेही आवडेल आणि तेही आवडेल किंवा याच्या उलटही होऊ शकेल. आपण किती लोकानुनयी व्हायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
६) गेल्या प्रतिसादात जे म्हटले, तेच येथेही पुन्हा म्हणतो - पटल्यास विचार करावा. नाही पटले तर विसरून जायला आपण मोकळे आहातच. य़ा लिहिण्यामागील पोटतिडीक जरूर लक्षात घ्यावी, असा आग्रह मात्र मी जरूर जरूर धरीन.
धन्यवाद.