या प्रसंगात लहान मुलाबद्दल वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मुलाकडे लक्ष न देता शेजाऱ्यांकडे जाऊन बसलेली 'ती' आणि बाहेर निघून गेलेला 'तो' हे मुलाकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीत सारखेच जबाबदार आहेत. मुलासाठी त्यांनी घरातले केबल कनेक्शन काढून टाकलेले आहे म्हणजे मुलाच्या संगोपनाबद्दल त्यांनी विचार केलेला आहे असे दिसते. ते पूर्ण बेजबाबदार आहेत असेही म्हणता येत नाही.
हल्ली आजीआजोबा असूनही बरीच मुले पाळणाघरात असतात याची बरीच कारणे आहेत. प्रकृतीअस्वास्थ्य, उतारवयात मुले सांभाळण्याबाबतची नाराजी (इतकी वर्षे केले, आता आम्हाला जरा मोकळेपणा पाहिजे), इत्यादी. काही ठिकाणी या कारणांवर मात करून वाटेल तेवढा त्रास सहन करून मुले सांभाळणारे आजीआजोबाही आहेत.
तिचे सतत उंच आवाजात बोलणे दिसते, पण नवरा हळू आवाजात जे बोलत असेल तेही तितकेच भयंकर असू शकेल. सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरांमधून आजही स्त्रियांकडून पारंपारिक अपेक्षा असतात. त्यातल्यात्यात सुशिक्षित घरांमध्ये अशा अपेक्षा कमी असतात हे खरे आहे, पण त्यातल्या काही ठिकाणी 'सुशिक्षित सासुरवास'ही आढळतो. मग जिथे शिक्षण कमी आणि त्यामुळे एकूणच प्रगल्भता कमी, अशा ठिकाणी तर विचारायलाच नको.
शक्यतो माणसे एकमेकांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करतात. सततच्या भांडणांमुळे असणारे ताणतणाव सर्वांनाच मनापासून नको असतात. तरीही जेव्हा भांडणे विकोपाला जातात तेव्हा सर्वांनीच विचार करून मार्ग काढण्याची गरज असते.
या ठिकाणी आपण प्रत्यक्ष मध्ये पडण्यापेक्षा दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांना समुपदेशनाची गरज आहे हे पटवून द्यावे. त्रयस्थ व्यक्तीशी माणसे जास्त विश्वासाने बोलतात. तेवढ्या मोकळेपणाने ते नातेवाईकांशी किंवा परिचितांशी बोलतीलच असे नाही. समुपदेशनाने कित्येक संसार सावरले गेले आहेत.