शब्दाची व्युत्पत्ती हा शोध रंजक खराच! वि.का.राजवाड्यांच्या लेखाची इथे आठवण होत आहे. 'विकार आणि विचार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती' या लेखात त्यांनी मुळाक्षरांच्या उगमाविषयी छान माहिती दिली आहे. लाखो वर्षांपूर्वीच्या मानवाने प्रथम ध्वनी, चित्र, रेषा, शब्ददर्शक रेषा, शब्दावयवदर्शक रेषा आणि अखेरीस मुळाक्षरे इथपर्यंत भाषिक प्रवास केला आणि त्यातून शब्द निर्माण झाला, असे राजवाडे म्हणतात.
कुठल्याही शब्दाच्या अर्थाचा मागोवा हा अखेरीस एका मर्यादेपर्यंतच घेतला जाऊ शकतो असे वाटते. कारण शब्दाची मागची रुपे तपासत गेले की पृथ:क्करण करीत आपण रेषा आणि चित्रापाशी येऊन थांबू. त्यामुळे मग शब्दाला अर्थ असतो हे विधान कदाचित चुकीचे वाटू शकेल आणि शब्द केवळ दर्शन घडवतो असे म्हणावे लागेल.
अर्थात हे मान्य करावे लागेल की दोन 'दर्शक' शब्द एकत्र आले की त्यातून जो बोध होतो (जो की त्या शब्दांहून निराळाच असतो) तो काहीएक ज्ञान प्राप्त करून देतो आणि मग मात्र या शब्दसमुच्चयाला 'अर्थ' मिळतो. त्यामुळे 'अर्थ' हा जाणिवेशी निगडीत आहे, दर्शनाशी नव्हे.
चित्त, शुद्ध मराठी, विकीकर, जीवन जिज्ञासा - माझे म्हणणे आपल्याला पटते आहे का? (की मी फारच 'बेसिक' काहीतरी मांडले? म्हणजे 'हे तुम्ही कशाला सांगायला पाहिजे? हे तरा माहीतच होते' - असे झाले का? चूक भूल देणे घेणे.....)