ग़ालिब, सुरेश भट आणि दुष्यंतकुमार ह्या तिघांनाही चर्चेत न ओढता मी आपले मत व्यक्त व्यक्त करतो.


मला स्वतःला मक्ता वाचायला आवडतो कारण त्यात गजलकाराची छाप दिसते, शेवटचा शेर असल्याचा संकेत मिळतो

एखादा अभंग तुकोबांचा आहे की नाही हे कळावे म्हणून "'तुका' म्हणे" पर्यंत थांबावे लागत नाही.

मराठी गझलेच्या द्विपदीत तखल्लुस (टोपणनाव) 'घुसडले' की बहुतेक वेळा तिची 'फिटिंग' बिघडते. उर्दू वृत्ते वापरायला लवचिक आहेत. तिथे तखल्लुस सहजपणे वापरणे सोपे आहे. मराठी वृत्तांत तशी लवचिकता नाही. म्हणूनच मराठीत तखल्लुस वापरणारे बहुतांश कवी  मात्रावृत्तांत, जातिवृत्तांत गझला लिहीत असावेत.

मला बहुतांश तखल्लुसाचा वापर अगदी हास्योत्पादक वाटतो. इतरांना तसे वाटायला हवेच असे माझे मत नाही.



गजलेला गझल म्हणा किंवा गजल, मला दोन्हींत काही वावगं वाटत नाही.   

'अ रोज़ बाय एनी अदर नेम वुड स्मेल ऍज स्वीट, हे ठीकच आहे. पण उर्दूत 'ग़ज़ल'साठी सध्या फक्त 'ग़ज़ल' हाच एक शब्द प्रचलित आहे. अर्थात कुणी 'रेख्ता'म्हटलेच तर त्याला फाशीची शिक्षा ठोठावणे न्यायाचे ठरणार नाही.

मला 'ग़जल' हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न मला 'प्रशस्त' वाटत नाही. ह्याबाबतीत मनोगतावरीलच गज़ल नको गझलच हवी  ह्या आता 'कालातीत' झालेल्या चर्चेत मी माझी मते मांडली आहे.

चित्तरंजन



अवांतर

कुठलेही मत कितीही प्रामाणिक, कळकळीने मांडलेले असले तरी ते सगळ्यांनी स्वीकारायलाच हवे असे नाही, हे कुणीही मान्य करील. ऐश्वर्या राय नावाची नटी जगातली  सर्वात सुंदर स्त्री आहे, असे मला वाटते. पण एखाद्याला जगात कुठलीच स्त्री मराठीतल्या अलका कुबल इतकी सुरेख नाही, असे वाटू शकते.
पण अशा चर्चांमुळे भूमिका स्पष्ट होतात. कुठल्या गोष्टीवर आपले बापजन्मात एकमत होऊ शकत नाही हे कळते. आणि पुढच्या वेळेस इतर गोष्टींवर न रेंगाळता केवळ कवितेबद्दल चर्चा करता येते.


गंमत
'ग' खाली, 'ज़'खाली नुक्ते' दिल्याशिवाय आमच्या अनेक गझलकार मित्रांना गज़लमय झाल्यासारखे वाटत नसावे. कारण 'ग़ज़ल'मधली  'नज़ाकत' काही औरच आहे, असे त्यांना वाटत असावे. पुढे 'शमा', एका हातात  'जाम' आणि 'मैफ़िले-गज़ल'मध्ये 'शेर पेश' करतो आहोत...  तेही गालिबच्या काळात... असे काहीसे 'फ़ील' येत असावे.






१. उर्दूत तखल्लुस हे शेवटच्याच द्विपदी घ्यायला हवे, घेतात असेही नाही. काहींनी पहिल्या द्विपदीत, मतल्यातही टोपणनाव घेतलेले आहे.
उदा:
'इन्शा'जी उठो अब कूच करो, इस शहर में जी को लगाना क्या
वहशी को सुकूं से क्या मतलब, जोगी का नगर में ठिकाना क्या
२. गझलेचे उर्दूतले आणखी एक नाव.