समोरच्या ढिगातून त्याने त्रेचाळीस दिवसांपूर्वीचे नियतकालिक उघडून काही चटोर शब्द खिशात खुळखुळवले. ते जरा हलके वाटले म्हणून त्याने पानगळ झालेल्या शब्दकोशातून काही पाने  उलट्या क्रमाने चाळून मोजून सतरा शब्द निवडले व ताणकाट्याने त्यांचे वजन करून तेही खिशात सारले. शब्दांना साज चढवायला त्याने तडक कोल्हापूर गाठले. शब्द हे शस्त्र असल्याने सोनाराने त्याचे हलकेच कान टोचले. मग त्याने शब्दांची बिनपाण्याने दाढी केली व त्यांच्याकडे कृपाळू दृष्टीने पाहत त्यांचे काय करायचे हा अविचार तो करू लागला. स्वतःला गालगुंड झाल्याचे त्याच्या वेळीच लक्षात आले. त्यामुळे त्याने गालगागा इत्यादीचा मनसुबा सोडून शब्द क्रमनिरपेक्ष ओघळू दिले. शब्दांचे ओघळ वेशीपर्यंत गेले आणि त्यात हत्ती बुडाला. लोक वाहवा करत राहिले.