हे "मराठी बाण्याचं" प्रकरण निघालं तेव्हा मलाही वाटलं होतं की हा माणूस करतोय ते चुकीचं आहे. माझ्या कार्यालयातल्या, विशेष करून अमराठी जनतेत त्याच्याबद्दल अढी निर्माण झालेली अगदी दिसत होती. संध्याकाळी घरी परतताना मला माझ्या गृहरचना संस्थेच्या बाहेरील अनधिकृत झोपडी, त्यासमोरील निम्मा रस्ता अडवणाऱ्या लाकडाच्या फळ्या (हा इसम सुतार होता), बाहेर रस्ता आपल्या तीर्थरूपांच्या मालकीचा असल्यागत ठेवलेल्या खाटा, पाण्याचा बंब, अनेक पिंप, बाहेर बांधलेली एक बकरी, कुठल्याही क्षणी रस्त्याच्या मध्ये येणारे ५ पोरं, सदा चुलीसमोर बसलेली ती बाई, एक म्हातारी आणि बघावं तेव्हा बनियन घालून करवतीने कापाकापी करणारे ४ भय्ये, हे सगळंच नाहीसं झालेल दिसलं.
आता हे माझं saddistic pleasure (शब्द सुचवावा) असेल कदाचित. पण एका कोपऱ्यात मला बरं वाटलं. एरवी किराणा दुकानातल्या त्या तेलकट पोराशी बोलताना उगाच हिंदीची चिंधी करणारी माझी बायको जेव्हा "किसी मराठी समझनेवालेको बुलाव" असं हिंदीत म्हणाली तेव्हा मी पण सुखावलो होतो. किमान अजूनपर्यंत तरी तो ताप टिकून आहे आणि तो मारवाडी मोडकं तोडकं का होईना मराठी बोलतो आमच्याशी.
दुसऱ्या दिवशी एका विपत्रातून आलेला राजचा खुलासा वाचला (त्याला अटक झाल्यानंतर २ दिवसांतली गोष्ट). त्याची ऐकलेली भाषणं (राजकीय आणि इतरही) आठवली. मला तरी तो माणूस समजूतदार वाटतो. आता कोणी सर्वाथानी बरोबर किंवा चूक कसा असेल? पण मला त्याच्या मतांत "भलतं चूक" काही वाटत नाही. मनसे नि माझ्या वॉर्डात मराठी मनुष्य उभा केला तर मी त्याला मत देईन बा.