श्री. भास्कर केन्डे,
आपल्या प्रभाकरपंतांसारखे एक जेष्ठ...
आपल्या - हा शब्द खुप-खुप आवडला. अगदी सुखावून वगैरे गेला म्हंटलं तरी चालेल. हल्ली मनापासून 'आपलं' कुणी म्हणतच नाही. 'मानणं' तर त्या पुढची पायरी झाली. तुम्ही मला 'आपलं' मानलत आणि मी धन्य झालो. या आपलेपणाला जन्मभर जपण्याची, डोंगरा एवढी, जबाबदारी माझ्या शीरावर आली आहे. ती निभावण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. कधी चुकलो तर कान धरा.
प्रभाकर -
आई-वडिलांनी बारशाला कौतुकाने हे नांव ठेवलं. 'पेठकर घराण्यात' जेष्ठ पुत्र. 'प्रभाकर म्हणजे सूर्य, तुला सूर्या प्रमाणे तेजस्वी व्हायला पाहीजे', हे लहानपणापासूनच काय, पण पाऽऽर मला ऐकू यायल्या लागल्या काळापासून, सतत माझ्या कानी कपाळी ओरडून, ही न पेलवणारी जबाबदारी, आई-वडिलांनी माझ्या बालखांद्यांवर टाकली. लौकीकार्थाने मी ही जबाबदारी पार पाडू शकलो नाही तरी 'सूर्याच्या' नांवाने मी बराच प्रभावित झालो. अर्थात, हे नांव मला नक्कीच आवडतं.पंतांसारखे - 'पंत', 'राव' 'महाशय' ही आणि अशी 'बिरूदं' मला फार अस्वस्थ करतात. परकेपणाची भावना जागवतात. 'तुम्ही 'वेगळे' आमच्यापैकी नाही' अशी कांहीशी भावना मनात निर्माण करतात. गर्दीत, गर्दीतीलच एक होऊन रमणाऱ्या मला 'एकटेपणा' जाणवू लागतो. या शब्दांमधून समोरच्याने व्यक्त केलेला आदर, माझा जीव धुसमटवू लागतो. त्यामुळे हि बिरुदं मला भयंकर टोचतात. त्या पेक्षा सिंपल् 'श्री.' मला आवडतं.
एक जेष्ठ - हा शब्द 'एक वृद्ध' या अर्थी पण, सन्मानपूर्वक वापरला जातो. जेष्ठ नागरीकांची वयोमर्यादा सरकारनेही 'वयवर्ष ६५ आणि त्या पुढील नागरिक' अशी केली आहे. त्या पदास पोहोचण्यास मला अजून १४ वर्ष बाकी आहेत. मनोगती का जबरदस्तीने मला 'तिकडे' ढकलताहेत कळत नाही. त्यामुळे हा शब्दही मला रूचत नाही. सध्या मी वयाने, 'उतार तारूण्यात' आहे.
श्री. भास्कर, आपल्या विनोदात माझे नांव गुंफल्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. उलट, माझे लिखाण वाचण्या व्यतिरिक्त इतर वेळीही माझी आठवण तुम्हाला झाली, ही भावना सुखावह आहे. आपल्या प्रेमाची ही पोचपावतीच आहे.
धन्यवाद.