त्या गोसाव्याने डॉ. वाकोडेंना सांगितल्याप्रमाणे ह्या गूढगीताचे दोन अर्थ आहेत.
मासोळी पकडण्यासाठी गळाला आमिष म्हणून आधी गांडूळ टोचतात. मग त्या गांडुळाला खाण्यासाठी मासोळी येते अन स्वतःच गळाला अडकते. तो गांडूळ मासोळीला म्हणतो आहे-
"मी मेलो तुझ्यासाठी, तू न मरावे माझ्यासाठी. जर तू मेलीस मजसाठी, वर उभा असे तो तुजसाठी. (वर तुला पकडणारा मासेमार उभा आहे.)"
दुसरा आध्यात्मिक अर्थ असा -
आपण दोघे एकमेकांवर इतके प्रेम करतो की एकमेकांसाठी मरायला तयार असतो. पण ही सर्व माया आहे. आणि हे मायाजाल पसरवणारा तो ईश्वर वरून आपली गमंत बघतो आहे. प्रेम करायचे तर एकमेकांवर नव्हे, त्या ईश्वरावर कर. त्याचा अंश जिथे जिथे आहे त्या सर्व प्राणीमात्रांवर कर. गांडूळ आणि मासोळी, तू आणि मी त्याच ईश्वराची रूपे आहोत. एकमेकांवर आंधळे प्रेम करणे म्हणजे आरश्यातील स्वतःच्या प्रतिबिंबावर प्रेम करण्यासारखे आहे. मी तुजसाठी अन तू मजसाठी कितीही वेळा मेलो तरी आपली ह्या मायाजालातून सुटका होणार नाही. ईश्वरावरील प्रेमानेच ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होईल.
कसा वाटला अर्थ? कुणाजवळ आणखी काही गूढ गीते असतील तर अवश्य इथे प्रकाशित करावीत.
आपला,
राजेन्द्र