तुमचा सात्त्विक संताप मला बरोब्बर कळला आहे. इकडे भुबनेश्वरमध्येही अशीच परिस्थिती आहे. मला इथल्या यष्टीचा फारसा अनुभव नाही पण ’इथल्या’ टाऊन बस प्रकाराचा हिसका माहीत आहे. तिकीट म्हणजे चिठोऱ्यावर अगम्य काही तरी गिरगटलेले हे इथेही आहे.
एकदा ऑटोचा संप होता म्हणून मी चालत निघाले होते पण मध्येच जरा रिकामी टाऊन बस दिसली म्हणून बसमध्ये चढले. पुढे थोडे अंतर गेल्यावर एका अधिकृत थांब्यावर ती थांबली आणि ती ’कम-कम’ मंडळी हाकारा करून माणसं बसमध्ये भरू लागली. १५ मिनिटं झाली तरी बसं ’हलियाचं’ चिन्ह दिसेना. बरं मी म्हणजे नेमके सुटे पैसे मुठीत धरून तिकीट मागून घेणारी, आपला स्टॉप यायच्या आत तिकीट काढून होईल की नाही ह्या शंकेने कसावीस होणारी. पण इथे तर कंडक्टरच दिसेना. कम-कम लोक डब्यात दाबून दाबून धान्य भरावं तशी माणसं भरण्यात गुंतलेली. मला पुढची काळजी की काही वेळानंतर बस चालू होईलही पण आपला स्टॉप (इथल्या भाषेत स्टॉपेज) आल्यावर ह्या माणसांच्या गर्दीतून आपण उतरणार कसे? शेवटी पेशन्स संपला आणि मी हिय्या करून बसमधून उतरले आणि ११ नंबरच्या बसने घरी गेले. (११ नंबरची बस म्हणजे दोन पायांनी चालत जाणे हा अत्यंत फालतू विनोद जाणकारांना माहीत असेलच.)
पण हा अनुभव मैत्रिणींना सांगितल्यावर 'अगं पण भद्र महिलांनी टाऊन बसमधून जायचंच नसतं.' हे ऐकायला मिळालं.