मराठी साहित्य महामंडळाचे नियम इथे परस्परविरोधी आढळले. एक नियम म्हणतो :-

मराठी शब्दांतील अकारा‌न्तापूर्वीचे इ-कार व उ-कार दीर्घ असतात :
उदाहरण : खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरूप, विहीर, दीर, नीट, मूल, ऊस, बहीण, जमीन, ठाऊक, घेऊन, वसूल

नियम ११ म्हणतो :-

'खरीखरी, हळूहळू' यासारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने दीर्घ लिहावेत. परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. *
उदाहरण : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु

पहिल्या नियमाची उदाहरणे पाहता त्यात एकही पुनरुक्त शब्द दिसत नाही. कुजबुज, कुणकुण, कुचकुच सारखा एकही शब्द त्यात नाही. 'कुजबुज' हा शब्द पूर्णाभ्यस्त (पूर्ण द्विरुक्त) नसला तरी अंशाभ्यस्त आहे. जर 'कुजबुज' पुनरुक्त व नादानुकारी मानला तर नियम ११नुसार तो 'कुजबुज' असाच लिहावा लागेल. ते मान्य नसेल तर पहिल्या नियमानुसार 'कुजबूज' लिहावे लागेल.
अरुण फडके या शुद्धलेखनतज्ञाच्या मराठी शुद्धलेखनकोशात हा शब्द 'कुजबुज' असा दिलेला आहे. इतर कोशांत हा शब्द खालीलप्रमाणे आढळला:

मोल्सवर्थ - कुजबुज                                                            M.K.Deshpande -कुजबू
सरमुकादम - कुजबुज                                                          विस्तारित शब्दरत्नाकर (ह. आ. भावे) - कुजबूज                       नवनीत मराठी-इंग्रजी-मराठी शब्दकोश - कुजबु
ठकार पर्याय शब्दकोश - कुजबु

यातील मोल्सवर्थ वगळता बाकीचे सारे शब्दकोश नवीन शुद्धलेखन नियमांनुसार लिहिलेले आहेत. यावरून असे दिसून येते की नियमांत काय किंवा कोशांत काय, या शब्दाच्या शुद्ध स्वरूपाविषयी एकवाच्यता नाही. त्यातल्या त्यात बहुमत व सध्या प्रसिद्धीझोतात असलेले तज्ञ अरुण फडके हे 'कुजबुज' च्या बाजूने आहेत असे दिसते.

ता. क. वर्तमानपत्रांतील लेखन शुद्धच असते असे मानण्याचा काळ कधीच सरला आहे. तेव्हा 'सकाळ', 'मटा', 'लोकसत्ता' यांवर विसंबून राहता येणार नाही.

* - इटॅलिक्स व अधोरेखन माझे आहे.