ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'सेमी इंग्लिश' माध्यमाची पद्धत पारखून यशस्वी सिद्ध झालेली पद्धत आहे.

आमच्या शाळेत सुरवातीला इतिहास भूगोल गणित आणि विज्ञान हे इंग्रजी माध्यमातून शिकवणाऱ्या दोन तुकड्या आठवीपासून असत. पुढे दोन तीन वर्षातच त्यातले इतिहास आणि भूगोल वगळण्यात आले.

माझे आठवी ते अकरावी हेच माध्यम होते. ( अकरावीला अंकगणित मात्र मराठीतून घेतले होते. ) सुरवातीला सहा महिने विज्ञानाची उत्तरे लिहिताना लटपट होत असे. "नुसते महत्त्वाचे शब्द लिहिलेत तरी चालेल." अशी आमच्या शिक्षकांनी चौमाही परीक्षेला मुभा दिलेली होती! मात्र पुढे काहीही त्रास झाला नाही. गणितात कधीच काही अडचण भासली नाही.

उच्चस्तरीय मराठी + प्राथमिक स्तरीय इंग्रजी हे मिश्रण महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणाऱ्या गुणांसाठी आवश्यकतेप्रमाणे प्रभावी तर ठरलेच; पण महाविद्यालयात इंग्रजी माध्यमाशी जुळवून घेणेही अजिबात कठीण गेले नाही. इंग्रजीतून गणित आणि विज्ञान शिकून मराठीच्या शब्दसंग्रहाचे काहीही नुकसान झाल्यासारखे वाटले नाही. उलट नवनवे शब्द, रचना शिकल्याने मराठीवर चांगलाच परिणाम झाला असे मला वाटते.

असे माध्यम शोधून काढणारी आमची शाळा पहिलीच असावी. (चू. भू. द्या. घ्या.) पुढे इतर अनेक शाळांनी त्याचा अंगीकार केल्याचे दिसले.