स्वाती नेहमीसारखीच ओघवती शैली, साधा अनुभव पण नेमक्या शब्दात मांडायचे कौशल्य तुझ्या लेखात नेहमी आढळते. गेल्या वर्षी आमच्याही अंगणात बदकाने अंडी घातली होती, पण १-२ दिवसातच मी कामावरून घरी आल्यावर पाहिले तर कोणीतरी मोडून टाकली होती . आता मी पण छत्रीची युक्ती लक्षात ठेवीन. काही दिवसांपूर्वीच एका पक्षाने आमच्या मुख्य दाराच्या वर घरटे बांधले, आधी मी त्याने आणलेल्या काटक्या काढून टाकत होते, कारण दार सारखे उघडायला लागायचे आणि तो पक्षी घाबरून उडून जायचा. पण त्याचे घरटे बांधणे चालूच असायचे. असे १०-१५ वेळा झाल्यावर मीच दमले, आणि तासाभरात पठ्ठ्याने (की पठ्ठीने) घरटे बांधलेही. पण दुर्दैवाने गेले दोन दिवस खूपच गारठा पडला (-१,-२ degree) आणि आजच त्यातले एक पिलू खाली पडले. मी बऱ्याच ठिकाणी (ह्युमेन सोसायटी वगैरेला) फोन करून विचारले की काय करायला पाहिजे. मला हात लावायचे धाडस होत नव्हते, एकतर ते अगदीच छोटे होते, एक-दीड इंचाएवढे, घरट्यात डोकावून पाहिले तर अजून २ पिले होती, ज्यांनी डोळेही उघडले नव्हते. आणि दुसरे म्हणजे लहानपणी ऐकले होते की पक्षांच्या पिलांना हात लावला तर त्याला ते परत त्यांच्यात घेत नाहीत. हे कोणाला खरे खोटे आहे ते माहिती आहे का? शेवटी काहीच चालेना, तेव्हा त्याला टिशूने उचलून ठेवले घरट्यात, कारण जमीन खूपच गार होती. बघूया काय होते ते, वाचले तर बरं होईल. तू लिहिलेस त्याप्रमाणे थोडा ब्रेड व पाणीही ठेवले.