आजतक किंवा तत्सम वाहिन्या या टी आर पी साठी वाट्टेल ते करायला तयार असतात. भूताचे चित्रीकरण हा त्यातलाच प्रकार. आपल्याकडील वाहिन्यांना नैतिकतेची बिलकूल चाड नाही.
विषयांतर करून एक ताजे उदाहरण सांगतो..`हकीकत जैसी खबर वैसी' असे ब्रीदवाक्य असलेल्या एका वाहिनीने रशियन अध्यक्ष पुतीन यांचे एका अभिनेत्रीशी असलेल्या कथित संबंधाबद्दल काही दिवसांपूर्वी काहीबाही दाखवले, जणू काही यांनाच सर्वकाही माहित आहे. प्रत्यक्षात ज्या रशियन वर्तमानपत्राने ती खोटी बातमी दिली त्या वर्तमानपत्राला खोटी बातमी दिल्याबद्दल माफी मागून गाशा गुंडाळावा लागला. आमच्या वाहिनीला त्याचे काही सोयरसुतक नाही. त्या वाहिनीने याविषयी नंतर चकार शब्द काढला नाही.
भूत असणे वा नसणे या या बद्दलच्या समजूती आपल्याच नाही तर अनेक अगदी पाश्चात्य देशातही आहेत. डिस्कवरीवर मोस्ट हॉण्टेड प्लेसेस नावाचा कार्यक्रमही असतो. ज्यात अशाप्रकारचे चित्रिकरण करून दाखवले जाते. (म्हणजे ज्या विशिष्ट व्यक्तीला भूत दिसल्याचे अनुभव येतात तिच्या कल्पनेनुसार). असे असले तरी तिथे सामान्यांना फारसा उपद्रव होत नाही.
असो... अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या समजूती बद्दल चांगले कार्य केले आहे. आपल्या समाजात अडाणीपणामुळे (निरक्षरता व्हे) भूत वगैरे समजूती आजही प्रचलित आहेत. अंनिसने अनेक प्रकरणातील तथाकथित रहस्याचा पर्दाफाश केलेला आहे. इच्छा अपूरी राहिल्यास भूत होते , ते बदला घेते या खुळ्या समजूती आहेत. तसे असते तर न्यायव्यवस्थेची गरज पडली नसती. दहशतवाद्यांनी ज्या निष्पाप लोकांचे बळी घेतले त्यांच्या भूतांनी या क्रूर लोकांचा कधीच बदला घेतला नसता? मुंबईत इतके बॉंबस्फोट झाले. त्यांची भूते जागोजागी दिसली असती. पण असे दिसत नाही. कारण भूत हा प्रकार जगात अस्तित्त्वातच नाही. भूत असलेच तर ते मनात असते. ज्या व्यक्तिला लहानपणापासून भूत हा शब्धच माहित नसेल त्याला भूताची भीती वाटणार नाही.
लहान मुलांना बागुलबुवा / अंधार इ. ची भीती घातली जाते. मग हे समज असेच राहतात. त्या समजातून चॅनेलवाल्यांना टीआरपी साठी खाद्य मिळते. कृपया सुजाण नागरिकांनी याला बळी पडू नये.