लाज का वाटावी? भारत देशाचा पुनर्जन्म होऊन अवघी ६० वर्षे झाली असताना संपूर्ण जग आज भारताला उगवती आर्थिक महासत्ता समजत आहे. आज भारत एक सक्षम लोकशाही असणारा देश आहे. इस्रो ने केलेली पी एस एल व्ही चे यशस्वी उड्डाण असो अथवा टाटा ची नवी कार असो प्रत्येक भारतीयाला अभिमानच वाटावयाला हवा.

माझा ताजा अनुभव सांगतो. परवा मी एक बर्कले विद्यापीठाच्या स्नातकाची मुलाखत घेतली. तो भारतीय कंपनी मध्ये काम करण्यासाठी अतिशय उत्सुक होता. हेच चित्र काही वर्षांपूर्वी ब्रिटिश आणि अमेरिकन कंपनी बाबत होते. ह्या वरून आपला देश प्रगती करतोय हे नक्की.

प्रत्येक देशाला समस्या असतात. त्यांना धैर्याने सामोरे गेले पाहिजे. सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा. उगाचच वड्याचं तेल वांग्यावर घातल्याने काही शेतकरी बांधवांच्या समस्या सुटणार नाहीत. ह्या सुबत्तेचे विकेंद्रीकरण करून आपला देश संपूर्ण समृद्ध कसा बनेल याचा विचार करायला हवा.

टाटा समूहाने देशासाठी केलेली मदत - आय आय एस सी बंगलोर. टाटा कर्क रोग संशोधन केंद्र. टाटा मूलभूत विज्ञान संशोधन केंद्र. टाटा चे पुणे संशोधन केंद्र शेतकरी आणि कष्टकारी लोकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. मागच्या वर्षी भाताच्या तुसापासून २२ रुपयात स्वच्छ पाणी बनावयाचे यंत्र विकसित केले.