अशा प्रकारचे शिक्षण देण्याची गरज आहे याबद्दल दुमत नसावे. ज्या रीतीने आणि गतीने समाजात या विषयाबद्दलच्या अंधश्रद्धा बोकाळत आहेत ते चिंताजनक आहे.

एका वृत्तपत्रसमूहाच्या आश्रयाला जाऊन स्वतःला 'आरोग्यतज्ञ' म्हणवून नावामागे 'डॉ' लावणाऱ्या व्यक्तीचे हस्तमैथुनाबद्दलचे विचार (२००८ सालचे) वाचले तर झीटच येते.

आचार्य अत्र्यांना 'ब्रह्मचारी' सिनेमा काढायची प्रेरणा देणारे "ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू" या पुस्तकाची पुढची (सुधारून वाढवलेली) आवृत्ती हे आरोग्यतज्ञ डॉ काढतील याची खात्री पटू लागते. आणि त्यांना प्रोत्साहन देणारा हा वृत्तपत्रसमूह जर 'जाणत्या', 'सुशिक्षीत', 'मध्यमवर्गीय', 'विचारी' या आणि अशा विशेषणांनी नटलेल्या समाजस्तरात खोलवर रुजलेला असेल (जे दुर्दैवाने खरे आहे) तर..... परिस्थिती खरेच चिंताजनक आहे. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

आता हे कसे प्रत्यक्षात उतरवायचे हे एक आव्हान आहे, आणि त्यासाठी समाजातील अनेकानेक घटकांना भिडेल, भावेल, पचेल आणि रुचेल अशी मोहीम राबवायला हवी. हडेलहप्पी केली तर संजय गांधीच्या नसबंदी योजनेचे १९७५-७७ च्या दरम्यान जे विद्रूपीकरण (आणि नंतर काँग्रेस पक्षासाठी शोकांतिका) झाले तसे होईल.